Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक पर्यटक जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि तणाव काहीसा निवाळला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची एनआयएच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर एनआयएने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरु केली होती. तेव्हापासून एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. आता या प्रकरणात एनआयएने मोठी कारवाई केली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना एनआयएने अटक केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय देत रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची ओळख पटली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने कारवाई करत दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाप्रकरणी दोन जणांना अटक केल्याचं एका निवेदनात एनआयएने म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

पहलगामच्या बटकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि पहलगाममधील हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर या दोघांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. ते लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हल्ल्यापूर्वी परवेझ आणि बशीर या दोघांनी जाणूनबुजून तीन सशस्त्र दहशतवाद्यांना हिल पार्क येथील हंगामी झोपडीत दहशतवाद्यांना आश्रय दिला मदत केली होती, असं एजन्सीने म्हटलं आहे. दरम्यान, या दोघांना आता एनआयएने अटक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एफएटीएफने केला होता निषेध

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक देशांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या होत्या. भारताने दहशतवादविरोधी भूमिका जगासमोर देखील मांडली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात एफएटीएफची प्रतिक्रिया समोर आली होती. एफएटीएफने २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच दहशतवादी समर्थकांमध्ये पैशांशिवाय आणि पैशांच्या हस्तांतरणाच्या साधनांशिवाय हे हल्ले होऊ शकत नाहीत, असं म्हटलं होतं.