Nimisha Priya: येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रिया प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. शुक्रवारी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सांगितले की, ते निमिषा प्रिया प्रकरणात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. येमेनमध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषाला १६ जुलै रोजी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार होती. असं असताना सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि ‘ग्रँड मुफ्ती’ यांच्या मदतीने निमिषा प्रियाची मृत्यूदंडाची शिक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

निमिषा प्रिया हिच्या कुटुंबालाच पीडितेशी झालेल्या चर्चेत सहभागी करून घेतले पाहिजे आणि इतर कुठल्याही हस्तक्षेपाचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. दरम्यान, निमिषाची फशी पुढे ढकलली असली तरी मृत महदी यांचे कुटुंबीय मात्र तिला माफ करायला तयार नाहीत. त्यामुळे भारत सरकारच्या प्रयत्नांची आता कसोटी लागणार आहे.

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला माहिती देण्यात आली की, येमेनमध्ये हत्येच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रियाच्या फाशीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. केंद्राकडून बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल आर वेंकटरमण यांनी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणात निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्यांनी असेही सांगितले की, सरकारला निमिषा प्रिया सुरक्षित परतावी असे वाटते. खंडपीठानेही हे मान्य केले. याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने सांगितले की निमिषाला प्रथम मृत महदीच्या नातेवाईकांकडून माफी मिळवावी लागेल आणि नंतर ब्लड मनीचा मुद्दा येईल.

याचिकाकर्त्याने न्यायालयाला माहिती दिली की, फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १४ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी याचिका आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या याचिकेत केंद्र सरकारला सर्व शक्य राजनैतिक मार्गांनी निमिषा हिला वाचवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी येमेन सरकारशी चर्चा करणारी समिती स्थापन करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी निमिषा प्रियाला २०१७मध्ये तिच्या येमेनी व्यावसायिक भागीदाराच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. तिला २०२० मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि २०२३ मध्ये अंतिम याचिका फेटाळण्यात आली. निमिषा सध्या येमेनची राजधानी सना इथे तुरूंगात आहे.