Nishikant Dubey : महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी असा भाषिक वाद निर्माण झाला आहे. काहीही झालं तरीही महाराष्ट्रात हिंदी सक्ती आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली. त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द झाल्यानंतर दोघांनी विजयी मेळावाही घेतला. दरम्यान भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. एवढंच नाही तर आपल्या घरात कुत्राही वाघासारखा वागतो, बाहेर पडून बघा पटक पटक कर मारेंगे म्हणत पातळी सोडत टीका केली. मुंबई आणि मराठी माणसाच्या विरोधात बोलणारे निशिकांत दुबे एकेकाळचे मुंबईकरच आहेत. कारण त्यांचा खारमध्ये फ्लॅट आहे अशी माहिती समोर आली आहे.

निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन काय?

निशिकांत मुंबईत १६ वर्षे राहात होते अशी माहिती समोर आली आहे. भाजपाचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या नावे बोटं मोडली. मात्र ठाकरे बंधू, मराठी माणूस यांच्यावर टीका करताना मुंबईत आपला फ्लॅट आहे याचाही विसर निशिकांत दुबेंना पडला आहे असं दिसून येतं आहे. मुंबईतल्या खार झुलेलाल अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. निशिकांत दुबे, 404, झुलेलाल अपार्टमेंट, मार्ग क्रमांक १६, खार पश्चिम असा होता. मुंबईतल्या खार या भागात असलेल्या या फ्लॅटची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. निशिकांत दुबेंनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी या फ्लॅटचा उल्लेख आपल्या मालमत्तेच्या यादीत केला आहे. १९९३ ते २००० या कालावधीत निशिकांत दुबे मुंबईत नोकरी करत होते. संचालक पद मिळवण्यापर्यंत त्यांनी प्रगती केली होती. मात्र मुंबईत राहिलेल्या या नेत्याला आता २०२५ मध्ये मुंबईच्या या सगळ्या वास्तव्याचा विसर पडलेला दिसतो आहे.

निशिकांत दुबेंनी घेतलेली मालमत्ता २००९ मध्ये

निशिकांत दुबे यांनी खारमधली ही मालमत्ता १ कोटी ६० लाख रुपयांना विकत घेतली होती. १६०० स्क्वेअर फुटांचा हा फ्लॅट आहे. या आलिशान फ्लॅटची आत्ताची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या घराचं भाडंही त्यांना मिळतं आहे असं सचिन अहीर यांनी विधान परिषदेत सांगितलं आहे.

काय म्हणाले सचिन अहीर?

भाजपाच्या मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात बोलणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंचा खारमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्याने भाडे तत्त्वावर दिला आहे. मुंबईत मराठी माणसाला राहायला घर नाही आणि बाहेरची माणसं इथे येऊन मालमत्ता घेत आहेत असं सचिन अहीर यांनी म्हटलं आहे. आता यावर निशिकांत दुबे बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निशिकांत दुबे यांनी काय म्हटलं होतं?

“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रादेखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, अशी पोस्ट दुबे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली. इतकंच नाही तर “मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं, त्यांना आपटून आपटून मारू,” अशा पद्धतीची भाषा दुबे यांनी वापरली. “तुम्ही काय म्हणता की मराठी बोलावं लागेल? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? येथे टाटा, बिर्ला, रिलायन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोणतंही युनिट नाही. टाटांनी तर पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही फक्त आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणता कर भरता? आणि तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत,” असं वक्तव्य त्यांनी मराठी माणसाला उद्देशून केलं होतं. हेच निशिकांत दुबे मुळचे मुंबईकर आहेत या गोष्टीचा त्यांना मात्र सोयीस्कर विसरल पडल्याचं दिसून येतं आहे.