लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटकपक्षांची भूमिका महत्त्वाची झाली होती. अशावेळी एनडीएचा घटकपक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितीश कुमार काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचंच लक्ष्य लागलं होते. एवढंच नाही, नितीश कुमार एनडीएची साथ सोडत परत इंडिया आघाडीबरोबर जातील, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पुढची पाच वर्ष आम्ही पंतप्रधान मोदींना साथ देऊ, असं आश्वासन नितीश कुमार यांनी दिली आहे. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
नेमकं काय म्हणाले नितीश कुमार?
“आम्ही नरेंद्र मोदींना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. ते गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान आहेत. तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. याचा मला आणि आमच्या पक्षाला आनंद आहे. मोदींनी गेल्या १० वर्षात देशातील जनतेची सेवा केली आहे. पुढे पाच वर्षही ते देशातील जनतेची सेवा करतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही पुढची पाच वर्षे मोदींबरोबर राहून त्यांना साथ देऊ आणि मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली.
हेही वाचा – चंद्राबाबू नायडूंचा नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव, ‘इंडिया आघाडी’च्या आकांक्षांवर पाणी?
विरोधकांनाही केलं लक्ष्य
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केलं आहे. “विरोधी पक्षातील काही लोक जनतेला भ्रमित करून यंदा जिंकून आले आहेत. पण पुढच्या वेळी विरोधी पक्षातले सगळे हारतील याचा मला विश्वास आहे. त्यांनी आजपर्यंत जनतेची कोणतीही कामे केली नाहीत. त्यापेक्षा जास्त कामे पंतप्रधान मोदी यांनी केली”, असे ते म्हणाले.
“ज्या गोष्टीसाठी तुम्ही मागाल आम्ही पाठिंबा देऊ”
पुढे बोलताना, “पुढच्या वेळी तुम्ही जिंकून याल, तेव्हा जास्त खासदार निवडून येतील. पुढच्या पाच वर्षात ज्या गोष्टीसाठी तुम्ही मागाल आम्ही पाठिंबा देऊ. आज एनडीएला बहुमत मिळालं आहे, आपण सगळे बरोबर चालणार आहोत. देशाला तुम्ही पुढे न्याल, तसेच राज्यांचाही विकास कराल याची मला खात्री आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “सगळे लोक तुमच्याच नेतृत्वात काम करतील याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत”, असं म्हणत नितीश कुमार यांनी खास शब्दांत मोदींना पाठिंबा दिला.