पाटणा : दिल्लीत रविवारी झालेल्या निती आयोगाच्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अनुपस्थित होते. ते करोनातून बरे होत असल्याने दिल्लीचा प्रवास त्यांनी टाळला असे कारण त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आले. मात्र गेल्या तीन आठवडय़ांत केंद्र सरकारच्या अशा चौथ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नितीशकुमार गैरहजर राहिले आहेत.

नितीशकुमार यांचा संयुक्त दल व भाजप या मित्रपक्षांदरम्यान संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत नितीशकुमार यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय ध्वजाबाबत १७ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. त्यालाही नितीशकुमार उपस्थित नव्हते. त्यानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या मेजवानीला, पाठोपाठ २५ जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या शपथविधीला ते गैरहजर राहिले होते.

भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पाटण्यात ३०-३१ जुलै रोजी समविचारी पक्ष संघटनांच्या बैठकीत जी वक्तव्ये केली त्यावर नितीशकुमार नाराज असल्याचे संयुक्त जनता दलाच्या सूत्रांनी सांगितले. अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या वेळी भाजप २०२४ ची लोकसभा निवडणूक तसेच २०२५ ची बिहार विधानसभा निवडणूक जनता दलाशी आघाडी करूनच लढेल असे जाहीर केले आहे.

भाजपनेत्यांच्या वक्तव्यावर नाराज?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते प्रक्षोभक भाषा वापरत असल्याची नितीशकुमार यांची भावना असल्याचे जनता दलाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपचे प्रवक्ते गुरू प्रकाश पासवान यांनी मात्र नितीशकुमार हेच २०२५ पर्यंत मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करतील. त्यांच्या दिल्लीतील बैठकीतील गैरहजेरीबाबत राजकीय अर्थ काढू नका असे स्पष्ट केले आहे.