बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिल्याबद्दल जद(यू)चे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी भाजपवर हल्ला चढविला आहे. बिहारमधील सध्याच्या राजकीय स्थितीलाही भाजपच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आपल्याला २००० मध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी मिळाला होता. मात्र त्या वेळी आणि सध्याची स्थिती यामध्ये तुलना करता येणार नाही, असेही नितीशकुमार म्हणाले.
जद(यू), समता पार्टी, भाजप, लोकजनशक्ती पार्टी आणि अपक्ष मिळून १५२ सदस्य निवडून (झारखंडनिर्मितीपूर्वी) आले होते तर राजदकडे १५२ पेक्षा संख्याबळ कमी होते. मात्र संख्याबळात नितीशकुमार कमी पडले त्यामुळे विश्वासदर्शक ठरावापूर्वीच त्यांना त्याग करावा लागला होता. जद(यू)कडे सध्या १३० आमदार असून राजद, काँग्रेस, भाकपचा एक आणि एक अपक्ष असे संख्याबळ आहे. अशा स्थितीत मांझी यांना १४ दिवसांचा कालावधी देणे याचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही, असेही माजी मुख्यमंत्री म्हणाले.
समर्थक मंत्र्यांची हकालपट्टी
मांझी यांचे समर्थक असलेल्या सात मंत्र्यांची जद(यू)मधून हकालपट्टी करण्यात आली असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह यांनी केली. नरेंद्र सिंह, ब्रिशन पटेल, शाहीद अली खान, सम्राट चौधरी, नितीश मिश्रा, मनचंद्र प्रसाद आणि भीमसिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
विश्वासदर्शक ठरावाबाबत मांझींची रणनीती
जितन राम मांझी यांनी मंगळवारी सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करून समर्थक मंत्री आणि आमदारांशी २० फेब्रुवारी सादर करण्यात येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाबाबत गुप्त चर्चा केली.दिल्लीहून परतल्यानंतर मांझी यांनी वार्ताहरांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देताच विमानतळावरून तडक अधिकृत निवासस्थानी धाव घेतली. विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू, असा विश्वास राज्याचे कला आणि सांस्कृतिकमंत्री विनय बिहारी यांनी व्यक्त केला. भाजपने विश्वासदर्शक ठरावाबाबत अद्याप रणनीती जाहीर केली नसली तरी आमची दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली, असे बिहारी म्हणाले.