बिहारमध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजद-काँग्रेससह असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी एनडीएसह सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं असून नितीश कुमारांनी आज २८ जानेवारी रोजी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथही घेण्याचा विक्रम नितीश कुमारांनी केला. शपथविधी कार्यक्रम झाल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्यांची थोडक्यात भूमिका स्पष्ट केली.

“मी सुरुवातीपासून एनडीएबरोबर होतो. पण आम्ही आमचे मार्ग बदलले. परंतु, आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो असून यापुढेही एकत्रच राहणार आहोत”, असं नितीश कुमार म्हणाले.

“आज आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काही मंत्री लवकरच शपथ घेतील. मी मुख्यमंत्री पदी शपथ घेतली असून माझ्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं आहे”, अशी माहितीही नितीश कुमार यांनी दिली.

हेही वाचा >> सकाळी राजीनामा, दुपारी पाठिंब्याचं पत्र, संध्याकाळी पुन्हा शपथ; नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी!

“आम्ही बिहारच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. मी जिथं होतो तिथंच (NDA) परत आलो आहे. आता पुन्हा इथं-तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीश कुमारांचा शपथविधी कार्यक्रम

दरम्यान, आज विधिमंडळात नितीश कुमारांनी राजद-काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर, त्यांनी राज्यापालांकडे जात राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपाच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना देत त्यांनी एनडीएकडून सरकार स्थापनेचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव राज्यपालांनी स्वीकारून आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. नितीश कुमारांनी आतापर्यंत नऊवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी पाचवेळा तर, दोन वर्षांत दोनवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.