बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ बंद करण्याची काँग्रेसची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरून नियमितपणे करीत असलेली मन की बात आचारसंहितेच्या काळात बंद करण्याची मागणी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली होती. त्यावर मन की बात व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर आचारसंहितेच्या काळात सरसकट बंदी घालता येणार नाही. मात्र मन की बात व मंत्रिमंडळाच्या निर्णयांमुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्याची तात्काळ दखल घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून निराशा आली. आनंद शर्मा म्हणाले की, मोदी हे भाजपचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे निवडणुकीत तेच मुख्य प्रचारक आहेत. अशा वेळी ते राजकीय हितासाठी सरकारी कार्यक्रमाचा वापर करू शकतात. त्यामुळे त्यांच्या ‘मन की बात’वर निवडणुकीदरम्यान प्रतिबंध घालण्यात यावा. येत्या रविवारी पंतप्रधान मोदी देशवासीयांशी ‘मन की बात’द्वारे संवाद साधणार आहेत. सत्तास्थापनेपासून मोदी नियमितपणे या माध्यमातून लोकांशी संवाद साधतात. हा कार्यक्रम चांगला अथवा वाईट- अशी कोणतीही टिप्पणी न करता शर्मा म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वत: या मुद्दय़ावर पुढाकार घेऊन मन की बात करू नये.