PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रथेप्रमाणे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधून या अर्थसंकल्पातून विकसित भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास दिला. दरम्यान विकसित भारतासाठी त्रिसुत्री मांडताना त्यांनी विदेशी कारवायांवरही हल्लाबोल केला. गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन आहे, ज्याच्याआधी कोणतेही विदेशी डावपेच आखले गेले नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या १० वर्षांत प्रथमच संसदेच्या अधिवेशनापूर्वी कोणीही विदेशातून आग लावण्याचा प्रयत्न केला नाही. २०२४ पासून हे बहुधा पहिलंचं संसदेचे अधिवेशन असेल, ज्यात आमच्या कारभारात कोणीही परकीय हस्तक्षेप केलेला नाही. एवढंच नव्हे तर या परकीय कारवायांना हातभार लावण्यास आपल्या देशातील अनेकजण कोणतीही कसर सोडत नाहीत, असंही मोदी म्हणाले.

२०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ

“भारताने ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. हे प्रत्येक देशवासियांसाठी सर्वाधिक गौरवपूर्ण आहे आणि जगातील लोकशाहीच्या देशांमध्ये भारताचे हे सामर्थ्य आपलं एक विशेष स्थान निर्माण करतो. देशातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा हे दायित्व दिलं आहे. या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं पूर्ण बजेट आहे. मी विश्वासाने सांगू शकतो की २०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याची १०० पूर्ण करू, विकसित भारताचा संकल्प या देशाने स्वीकारला आहे. हा अर्थसंकल्प एक नवा विश्वास निर्माण करेल. नवीन ऊर्जा देईल की देश १०० वर्षे साजरे करेल तेव्हा विकसित झालेला असेल. १४० कोटी देशवासिय आपल्या सामूहिक प्रयत्नांनी या संकल्पाला पूर्ण करतील”,असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट त्रिसुत्री

“तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही मिशन मोडमध्ये देशाला सर्वांगिण विकासाच्या दिशेने घेऊन जात आहोत. यामध्ये भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिक भिन्न स्तरावरील सर्वांगिण विकासाच्या संकल्पावरून मिशन मोडमधून पुढे जात आहोत. इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट या सातत्याने आमच्या आर्थिक गतीसाठी आधार राहिले आहेत. या सत्रात नेहमीप्रमाणे काही ऐतिहासिक विधेयकावर चर्चा होईल. व्यापक मंथनासोबत राष्ट्राची ताकद वाढवणारे कायदे बनतील. नारी शक्तीच्या गौरवाला पुनर्प्रस्थापित करणारे, प्रत्येक महिलेला समान अधिकार देणारे निर्णय या अधिवेशनात घेतले जातील”, असं मोदी म्हणाले.