दहशतवादी हे चांगले किंवा वाईट नसतात, ते फक्त दहशतवादीच असतात, असे मत केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी व्यक्त केले. ते गुरूवारी दिल्लीतील दहशतवादविरोधी परिषदेत बोलत होते. यावेळी व्ही.के.सिंह यांनी जगभरात कट्टरतावादाच्या प्रचाराला बळी पडणाऱ्या उच्चशिक्षित तरूणांच्या वाढत्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त केली. भारताची दहशतवादाबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. दहशतवादी चांगले किंवा वाईट नसतात, ते फक्त दहशतवादीच असतात. त्यामुळेच दहशतवाद्यांना धर्म , जात किंवा रंग नसतो ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांची केवळ एक विचारसरमी असते. या माध्यमातून हानी पोहचवणे, गोंधळ निर्माण करणे आणि स्वत:साठी व आपल्या विचारसरणीला प्रसिद्धी मिळवणे हाच त्यांचा हेतू असतो. इस्त्रायलने अशाप्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांपासून अनुभव घेत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देणारी मजबूत यंत्रणा उभारली आहे. आपल्या देशालाही दुर्देवाने मुंबईतील २६\११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दहशतवादी संघटना अशाप्रकारचे हल्ले करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आपल्याला कायम दक्ष राहिले पाहिजे, असे व्ही.के. सिंह यांनी सांगितले.