पुण्याच्या जर्मन बेकरीबाबत यासिन भटकळ याने केलेल्या उलटसुलट दाव्यांनंतर या स्फोटाचा पुन्हा एकदा तपास केला जाणार किंवा कसे, याबाबत निर्माण झालेल्या शंकांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. अशा चौकशीचा सध्या कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या जर्मन बेकरीतील स्फोटात आपल्याबरोबर मिर्झा हिमायत बेग नव्हे, तर कतील सिद्दिकी हा अतिरेकी सहभागी होता, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेच्या चौकशीत यासिन भटकळ याने केला
होता.
त्या पाश्र्वभूमीवर सदर प्रकरणाचा पुन्हा एकदा नव्याने तपास करण्याची गरज बोलली जाऊ लागली होती.
१७ जणांचा नाहक बळी घेणाऱ्या या स्फोटातील सहभागी म्हणून बेग याला यापूर्वीच मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रान्वये सदर शिक्षा सुनावली गेली होती. विशेष म्हणजे दिल्ली पोलीस तसेच बंगळुरू पोलीस या दोहोंनीही मिर्झा बेग याचा उल्लेख केलेला नाही.
सोमवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याची गरज नसल्याचे नमूद केले होते. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनीही त्याचीच री ओढत जर्मन बेकरी स्फोटाचा पुन्हा तपास करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.