अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना अडचणीत आणणणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. भारतीयांकडून मागणी असलेल्या एच-१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर्स म्हणजेच साधारण ८८ लाख रुपये इतकं वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. यामुळे तीन लाख भारतीयांना शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय बेजबाबदार आणि अत्यंत दुर्दैवी आहे अशी टीका अमेरिकेतल्या सिनेट सदस्यांपैकी काहींनी केली आहे.

अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा फटका बसला आहे

एच १ बी व्हिसासाठी १ लाख ७६ हजार ते ५ लाख रुपये असं शुल्क आत्तापर्यंत आकारलं जात होतं. हे व्हिसा तीन वर्षांसाठी वैध असत आणि त्यानंतर नुतनीकरण करण्यात येई. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता भारतीयांना मोठा फटका बसणार आहे. १ लाख डॉलर्स इतकं शुल्क आकारण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. एच १ बी व्हिसाचा गैरवापर हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अनेक एच १ बी व्हिसाधारक कामासाठी किंवा सुट्टीच्या निमित्ताने बाहेर गेले आहेत त्यांनी २४ तासांत परतावं असंही सांगण्यात आलं आहे. असं न केल्यास २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून लागू होणाऱ्या सरकारी आदेशानुसार त्यांना अमेरिकेत परतण्यास मज्जाव केला जाऊ शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केला व्हिसा धोरणात बदल

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा धोरणात बदल केला असून यापुढे एच १बी व्हिसासाठी अमेरिकन कंपन्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रतिवर्षी १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये भरण्याची तरतूद केली आहे. या निर्णयाचा फटका अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसणार असल्याचे बोलले जाते. या व्हिसाचा फायदा भारतीय नागरिकांनी अधिक घेतल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. या निर्णयानंतर आता मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉरगन आणि ॲमेझॉन सारख्या कंपन्यांनी एच-१बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ॲमेझॉन कंपनीने सर्व एच-१बी आणि एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला असून २१ सप्टेंबरच्या आत अमेरिकेत परतण्यास सांगितले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या नियमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. एच-४ व्हिसाधारक हे एच-१बी व्हिसा धारकांचे कायदेशीर पती-पत्नी आणि अविवाहित मुले आहेत.