‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर विविध स्तरांतून बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं जात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तसंच बॅनर्जींना मिळालेल्या नोबेलबाबत ट्विट करताना हेगडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीरनाम्यात समावेश केलेल्या ‘न्याय’ योजनेच्या संकल्पनेची मांडणी करण्यात अभिजीत बॅनर्जी यांची महत्त्वाची भूमिका होती. गरिबी हटवणारी ‘न्याय’ योजना असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. याबाबत ट्विट करताना हेगडे यांनी, “ज्या व्यक्तीने ‘पप्पू’च्या माध्यमातून महागाई आणि करप्रणाली वाढवण्याची शिफारस केली होती, त्या व्यक्तीला 2019 चा नोबेल पुरस्कार मिळाला. न्याय योजनेचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला नोबेल मिळाल्याबाबत ‘पप्पू’ला आनंद झाला असेल” असं म्हटलं. पण, त्यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांकडून हेगडे यांच्यावरच टीका होत असून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न होत आहे.
Yes, the man who recommended #inflation & #tax rates to be raised for our country via #Pappu, has been recognized and awarded #NobelPrize2019.
Pappu can really feel proud of his #NYAY proponent while the poor nation missed out the benefits!!!!!!!!!!
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) October 14, 2019
Yes, the man who recommended #inflation & #tax rates to be raised for our country via #Pappu, has been recognized and awarded #NobelPrize2019.
Pappu can really feel proud of his #NYAY proponent while the poor nation missed out the benefits!!!!!!!!!!
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) October 14, 2019
He he……Mr Hegde pls also advice your finance minister as to how we can get our economy back on tracks.
— Parul Nigam (@ParulNigam9) October 14, 2019
जागतिक दारिद्रय़ निर्मूलनासाठीच्या संशोधनाला पुरस्कार –
‘‘बॅनर्जी, डफलो, क्रेमर यांच्या संशोधनामुळे जागतिक दारिद्रय़ाशी सामना करण्याच्या आमच्या क्षमतेत भरपूर सुधारणा झाली. प्रयोगावर आधारित त्यांच्या नव्या दृष्टिकोनामुळे केवळ दोन दशकांत विकासात्मक अर्थशास्त्राचे स्वरूप बदलले आणि आता या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे,’’ अशा शब्दांत नोबेल निवड समितीने पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला. बॅनर्जी आणि फ्रेंच वंशाच्या अमेरिकी संशोधक डफलो यांनी प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन केले, तर क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. डफलो अर्थशास्त्रात नोबेल मिळालेल्या दुसऱ्या महिला आणि सर्वात तरुण विजेत्या आहेत. या पुरस्काराची ९ लाख १८ हजार डॉलर्सची रक्कम या तिघांना विभागून देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे अमर्त्य सेन यांना यापूर्वी १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. त्यानंतर हा सन्मान मिळालेले अभिजित बॅनर्जी हे दुसरे बंगाली आहेत. क्रेमर हे विकास अर्थशास्त्रज्ञ असून ते सध्या हार्वर्ड विद्यापीठात विकासात्मक समाज विषयाचे प्राध्यापक आहेत.
‘भारतीय अर्थव्यवस्था निसरडय़ा वाटेवर’
भारतीय अर्थव्यवस्था निसरडय़ा वाटेवर असल्याची प्रतिक्रिया नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी एका अमेरिकी वृत्तवाहिनीवर व्यक्त केली. विकासदराचा ताजा तपशील पाहता अर्थव्यवस्था नजीकच्या भविष्यात तरी पूर्वपदावर येईल याची खात्री वाटत नाही, असा परखड अभिप्राय त्यांनी दिला. गेल्या पाच-सहा वर्षांत थोडीफार वाढ तरी झाली होती; पण आता ती शक्यताही दिसत नाही, असे बॅनर्जी यांनी सांगितले. कारकीर्दीत इतक्या लवकर नोबेल मिळेल, असे वाटले नव्हते, असेही ते म्हणाले.
कुठल्याही महिलेला यशस्वी होता येते आणि तिच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळू शकते हे नोबेल पुरस्कारातून सिद्ध झाले आहे. यातून इतर महिलांना प्रेरणा मिळेल आणि पुरुषांनाही महिला सन्मानास पात्र असतात, हे समजेल. – एस्तेर डफलो
नोबेल कशासाठी?
रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने या तिघांचा सन्मान करताना, ‘‘जागतिक दारिद्रय़ाशी सामना करताना या तिघांच्या संशोधनाची मोठी मदत झाली,’’ असे म्हटले आहे. जागतिक दारिद्रय़ाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी अनेक प्रश्नांची विश्वासार्ह उत्तरे शोधून काढली. त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे गेलेले इतर अर्थशास्त्रज्ञ यांनी दारिद्रय़ाशी दोन हात करण्यात मोठी मदत केली आहे. त्यांच्या या अभ्यासातून भारतातील ५० लाख मुलांना लाभ झाला. तसेच रोगप्रतिबंधात्मक योजनांना अनुदाने देण्याच्या अनेक देशांनी अवलंबलेल्या धोरणाला या तिघांच्या संशोधनाचा मूलाधार होता, अशा शब्दांत नोबेल निवड समितीने या शास्त्रज्ञांचा गौरव केला आहे.
अभिजित बॅनर्जी
बॅनर्जी (वय ५८) यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्डमधून पीएचडी मिळवली. सध्या ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. २००३ मध्ये बॅनर्जी यांनी डफलो आणि सेंधील मुल्लयनाथन यांच्यासह ‘अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’ची स्थापना केली होती. ते या अर्थशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक आहेत. संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या उच्चस्तरीय समितीत त्यांचा समावेश होता. त्यांनी २०१५ नंतरचा विकास कार्यक्रम आखण्यात मदत केली.
एस्तेर डफलो
डफलो यांचा जन्म १९७२ मध्ये झाला. त्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. अब्दुल लतीफ जमील दारिद्रय़ निर्मूलन प्रयोगशाळेच्या त्या सहसंचालक आहेत. बॅनर्जी यांच्यासह त्यांनी ‘पुअर इकॉनॉमिक्स- ए रॅडिकल रिथिंकिंग ऑफ द वे टू फाइट ग्लोबल पॉव्हर्टी’ हा संशोधनपर ग्रंथ लिहिला. या पुस्तकाच्या १७ भाषांमध्ये अनुवादित आवृत्त्या प्रकाशित झाल्या. डफलो यांनी आरोग्य, शिक्षण, आर्थिक सर्वसमावेशकता, पर्यावरण, प्रशासन या क्षेत्रांतही काम केले आहे. पॅरिसमधील संस्थेत त्यांचे शिक्षण झाले. नंतर १९९९ मध्ये त्यांनी एमआयटीतून पीएच.डी. मिळवली. डफलो यांना अनेक पुरस्कार मिळाले असून २०१५ मध्ये प्रिन्सेस ऑफ अस्तुरिया पुरस्कार, एएसके समाजविज्ञान पुरस्कार, इन्फोसिस पुरस्कार (२०१४), डेव्हिड केरशॉ पुरस्कार (२०११), जॉन बेट्स क्लार्क पदक (२०१०), मॅकआर्थर विद्यावृत्ती (२००९) हे सन्मान त्यांना लाभले.