किबिथू (अरुणाचल प्रदेश)

भारतीय भूमीवर कोणीही अतिक्रमण करू शकेल असा काळ आता सरला असून सीमेकडे पाहण्याचे धाडसही कोणी करू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे केले.

अरुणाचलच्या सीमा भागातील किबिथू येथे ‘व्हायब्रंट व्हिलेजेस’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शहा म्हणाले की, लष्कर आणि ‘आयटीबीपी’ जवानांच्या शौर्यामुळे, भारताच्या एक इंच भूमीवरही कोणी अतिक्रमण करू शकत नाही, हे अधोरेखित होते. ईशान्येकडे केलेल्या पायाभूत सुविधा आणि अन्य विकासकामांकडे लक्ष वेधत, सीमा भागाला मोदी सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचा दावा शहा यांनी केला. १९६२ च्या युद्धात शहीद झालेल्या किबिथू नागरिकांना शहा यांनी आदरांजली वाहिली. साधनांची कमतरता असूनही किबिथूंनी दुर्दम्य भावनेने लढा दिला, असे शहा म्हणाले.

अरुणाचल प्रदेशात कोणीही एकमेकांना ‘नमस्ते’ म्हणत नाही, तर ‘जयहिंद’ म्हटले जाते. त्यामुळे आपली मने देशभक्तीने भरून जातात. अरुणाचलवासीयांच्या या वृत्तीमुळेच अरुणाचलवर कब्जा करण्यास आलेल्या चीनला माघार घ्यावी लागली, असे शहा यांनी नमूद केले.

पूर्वी सीमेला भेट देऊन आलेले लोक आपण देशाच्या शेवटच्या खेडय़ाला भेट दिल्याचे म्हणत असत, मात्र मोदी सरकारने हे चित्र बदलले आणि आता आम्ही देशाच्या पहिल्या खेडय़ाला भेट दिल्याचे सांगतात, असे शहा म्हणाले.

चीनचा पुन्हा कांगावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीजिंग : अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर टीका करताना, भारताने चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप चीनने केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याने झांगनान (अरुणाचल प्रदेशचे चिनी नाव) हा चीनचा भाग असल्याचा दावा सोमवारी पुन्हा केला. तसेच या भागातील भारतीय अधिकाऱ्यांच्या हालचाली सीमा भागात शांतता राखण्याच्या दृष्टीने योग्य नाहीत. त्यामुळे त्यांना आमचा ठाम विरोध आहे, असेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले. भारताने मात्र चीनचा दावा सपशेल फेटाळला.