काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात काही अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी दुकांनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी आरिफ खान नावाच्या एका व्यक्तीवर आरोप करण्यात आले होते. तसेच आरिफ खानने या भागातील एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केला, असा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. या घटनेवरून वाद सुरू असतानाच आता उत्तराखंडमधील अनेक गावात गैर हिंदू आणि रोहिंग्या मुस्लीमांना प्रवेश बंदी असल्याचे पोस्टर्स गावाबाहेर लावण्यात आले आहेत. यावरून आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अनेक गावांच्या बाहेर गैर-हिंदू फेरीवाले आणि रोहिंग्या मुस्लीमांना प्रवेश बंदी आहे, असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यापूर्वी चमोली जिल्ह्यातील काही गावातही अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आल्याचे वृत्त आहे. या पोस्टर्सवरून मुस्लीम संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक अभिनव कुमार तसेच रुद्रप्रयागच्या पोलीस अधिक्षकांची भेटही घेतली.

हेही वाचा – Swami Avimukteshwaranand alleges Kedarnath Gold Scam : ‘केदारनाथ धाम मंदिरात २२८ किलो सोन्याच्या जागी पितळ बसवलं’, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप

यासंदर्भात द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष नैयर काझमी म्हणाले, “उत्तराखंडमधील काही गावांमध्ये मुस्लीमांच्या प्रवेश बंदीसंदर्भातील पोस्टर्स लावण्यात येत आहेत. याप्रकरणी आम्ही पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी”, अशी मागणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी रुद्रप्रयागचे पोलीस अधिक्षक प्रबोधकुमार घिलडीयाल यांनी हिंदुस्तान टाईम्सला प्रतिक्रिया दिली आहे. “रुद्रप्रयागच्या जिल्ह्यातील काही गावांमध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स आढळून आले आहेत. हे पोस्टर्स आम्ही काढले आहेत. काही गावातील पोस्टर्स काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे. हे पोस्टर्स लावणाऱ्यांची ओळख करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे”, असे ते म्हणाले. पुढे बोलताना, “याप्रकरणी गावातील सरपंचांची बैठक घेण्यात आली असून त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. जर कुणी अशाप्रकारे पोस्टर्स लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Cow Meat Smuggling Suspect Died: …आणि जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ठेवली ओलीस, केली धक्काबुक्की; उत्तराखंडमध्ये गोमांस तस्करीच्या आरोपावरून जमाव संतप्त!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात बोलताना, पोस्टर्स लावण्यात आलेल्या गावाचे सरपंच प्रमोद सिंग म्हणाले, “अशा प्रकारचे पोस्टर्स आमच्याच गावात नाही, तर इतरही काही गावांमध्ये लावण्यात आले आहेत. पण हे गावकऱ्यांनी लावले असून यात ग्रामपंचायतीची कोणतीही भूमिका नाही” पुढे बोलताना, “पोलीस व्हेरीफिकेशन शिवाय गावात प्रवेश करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. गावातील अनेक पुरुष कामानिमित्त बाहेरगावी असतात, त्यामुळे महिला या घरी एकट्या असतात, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आहे. जे मुस्लीम नेहमी गावात येतात, त्यांच्या प्रवेशावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.