scorecardresearch

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रामुळे जपानमध्ये धोक्याचा इशारा ; हवाई हद्दीचे उल्लंघन झाल्याने निषेध

अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील ग्वॉम प्रांत आणि त्यापलीकडे पोहोचण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रामुळे जपानमध्ये धोक्याचा इशारा ; हवाई हद्दीचे उल्लंघन झाल्याने निषेध
उत्तर कोरियाने या भागातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करण्यासाठी हे प्रकार सुरू केल्याचे दिसत आहे.

एपी, सेऊल : उत्तर कोरियाने मंगळवारी एक मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ( बॅलेस्टिक मिसाईल) डागले. ते जपानची हवाई हद्द ओलांडून प्रशांत महासागरात कोसळले. जपान आणि दक्षिण कोरियाने ही माहिती दिली.

उत्तर कोरियाने या भागातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करण्यासाठी हे प्रकार सुरू केल्याचे दिसत आहे. त्यांनी विविध शस्त्रचाचण्या वाढवल्याचे समजते. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले, की, उत्तर कोरियाने डागलेले एक क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीतून जाऊन प्रशांत महासागरात कोसळले. गेल्या पाच वर्षांत प्रथमच उत्तर कोरियाने अशा प्रकारे क्षेपणास्त्र डागले आहे.

त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जपानच्या प्रशासनाने ईशान्य भागातील रहिवाशांना इमारती सोडण्यासाठी धोक्याचा इशारा दिला. २०१७ नंतर प्रथमच असा इशारा जपानच्या सरकारला द्यावा लागला. जपानमधील होक्काइदो व आओमोरी भागातील रेल्वेसेवा काही काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. नंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील ग्वॉम प्रांत आणि त्यापलीकडे पोहोचण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. अमेरिकेने या चाचणीचा निषेध केला आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध करताना पत्रकारांना सांगितले, ती उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या चाचणीचा तीव्र निषेध करतो. आम्ही राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत यासंदर्भात चर्चा करू. जपानच्या मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले, की उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. २२ मिनिटे आकाशात प्रवास करून हे क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर समुद्रात कोसळले.

दक्षिण कोरियाकडून अमेरिकेशी समन्वय

दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या संयुक्त प्रमुखांनी सांगितले, की त्यांना उत्तरेकडून ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली. दक्षिण कोरियाचे लष्कर या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात अमेरिकेशी समन्वय केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या