उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी; जागतिक स्तरावरून टीकेचा भडिमार
अणुबॉम्बपेक्षाही अधिक संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बची बुधवारी उत्तर कोरियाने यशस्वी चाचणी केली. कमालीची गुप्तता पाळून केलेल्या या चाचणीमुळे उत्तर कोरिया जागतिक टीकेचा धनी ठरला आहे. उत्तर कोरियाची ही कृती जागतिक शांतता धोक्यात आणणारी असून त्या देशावर अधिकाधिक कडक र्निबध लागू करण्यात येतील, असे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले आहे. तर जागतिक पटलावर उत्तर कोरियाचा खंदा समर्थक म्हणवल्या जाणाऱ्या चीननेही या चाचणीवर सडकून टीका केली असून संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात येणार असलेल्या कारवाईला पाठिंबा दर्शवला आहे.
उत्तर कोरियाच्या ईशान्येला असलेल्या पुंगेई-री या अणुचाचणी केंद्रानजीक बुधवारी सकाळी जोरदार धक्के जाणवले. आंतरराष्ट्रीय भूकंपमापक यंत्रावर या धक्क्य़ाची नोंद झाली. प्रथमत हा धक्का भूकंपाचा असावा असा कयास होता. मात्र, उत्तर कोरियाच्या सरकारी दूरचित्रवाणीने ‘उत्तर कोरियाने प्रथमच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली असून ती यशस्वी ठरली आहे’, असे घोषित केले.
जागतिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया
उत्तर कोरियाने केलेल्या चाचणीचे जगभरात तीव्र पडसाद उमटले. उत्तर कोरियावर जगभरातून टीका होऊ लागली आहे. भारताबरोबरच अनेक देशांनी उत्तर कोरियाचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे.जागतिक शांतता धोक्यात आणली असल्याचा या टीकेचा सूर होता.
इराण-सौदी अरेबियात तणाव
तेहरान : उत्तर कोरियाच्या कृतीने एकीकडे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला असताना मध्य पूर्वेतही अशांतता निर्माण होऊ लागली आहे. शिया धर्मगुरूंच्या शिरच्छेद केल्यामुळे सौदी अरेबियाविरोधातील वातावरण तापू लागले आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या इराणच्या प्रयत्नांत सौदीने अडथळे आणू नये असा इशारा इराणने दिला आहे. तर कुवेतने इराणमधील राजदूत माघारी बोलावला असून बहारिनने इराणशी हवाई संबंध तोडले आहेत.
काय आहे हायड्रोजन बॉम्ब
- अणुबॉम्बपेक्षा हायड्रोजन बॉम्ब हजार पटींनी घातक
- हायड्रोजन बॉम्ब सहा किलोटन क्षमतेचा असल्याचा दक्षिण कोरियाचा दावा
- संहारक क्षमता अधिक असल्याने जागतिक शांततेस धोकादायक
जागतिक समुदाय साशंक
हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचा दावा उत्तर कोरिया करत असला तरी या दाव्याबाबत तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली असेल तर जाणवलेले धक्के दहापट जास्त असते. त्यामुळे ही चाचणी नेमकी हायड्रोजन बॉम्बचीच होती का, याबाबत शंका असल्याचे मत संरक्षणतज्ज्ञ ब्रुस बेनेट यांनी व्यक्त केले आहे.
- उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन याचां उद्या, शुक्रवारी वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांना ही अनोखी भेट दिली असल्याचे उत्तर कोरियाच्या सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
- या कृत्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली असून उत्तर कोरियाच्या र्निबधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर कोरियाने केलेल्या चाचणीवर तातडीने प्रतिक्रिया देणे घाईचे होईल. त्यांच्या कृतीला सडेतोड उत्तर दिले जाईल व कोरियन द्वीपकल्पातील आमच्या मित्र देशांना असलेला आमचा पाठिंबा कायम राहील.
जॉन किर्बी, अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्त
उत्तर कोरियाची ही कृती अत्यंत बेजबाबदार आहे. आम्ही या कृतीचा निषेध करतो. त्यांनी परिस्थिती चिघळवू नये.
हुआ शुनयिंग, चीन परराष्ट्र खात्याचे प्रवक्त
उत्तर कोरियाची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे कोरियन द्वीपकल्प अशांततेच्या गर्तेत ढकलला गेला आहे.
रशियन परराष्ट्र खाते
उत्तर कोरियाने केलेल्या कृतीने आमच्या देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे आम्ही कदापिही सहन करू शकत नाही.
शिंझो अॅबे, जपानचे पंतप्रधान
आम्हाला सगळ्यात जास्त धोका आहे. आमचे भवितव्य धोक्यात आले आहे.
पार्क ग्युएन हाय, द. कोरियाचे अध्यक्ष
हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेणे म्हणजे चिंताजनक परिस्थिती आहे. आमच्या शेजारचे देश आणि ईशान्येकडील आशिया यांच्यातील अणुसहकार्य करारामुळे आमच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
विकास स्वरूप, भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते