नवी दिल्ली : देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना (ओबीसी) जाणीवपूर्वक अयोग्य ठरवण्याचा प्रकार हा नवा मनुवाद आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. हा प्रकार अपवादात्मक नसून सर्वत्र घडत असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल यांनी अलीकडेच दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (डीयूएसयू) विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. त्याची ध्वनिचित्रफित त्यांनी मंगळवारी ‘एक्स’वर प्रसिद्ध केली. ‘एससी’, ‘एसटी’, ‘ओबीसी’ समुदायाच्या पात्र उमेदवारांना शिक्षण आणि नेतृत्वापासून दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक अयोग्य घोषित केले जाते, असा आरोप त्यांनी केला.
योग्य आढळले नाही (एनएफएस) या यंत्रणेचा वापर करून प्राध्यापकांच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त राखीव जागा आणि सहयोगी प्राध्यापकांच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त राखीव जागा रिक्त आहेत असे राहुल यांनी म्हटले आहे. याला कोणत्याही संस्था अपवाद नाहीत. आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे अशा सर्व ठिकाणी हेच कारस्थान सर्वत्र सुरू आहे. ‘एनएफएस’ हे राज्यघटनेवरील आक्रमण आहे, हा सामाजिक न्यायाचा विश्वासघात आहे असे राहुल यांनी लिहिले आहे.
शिक्षण हे समतेचे सर्वात मोठे हत्यार होते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हत्यार बोथट करण्यात व्यग्र आहेत. – राहुल गांधी, नेते काँग्रेस</p>