Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज एक हल्ला झाला. यानंतर दिल्ली पोलिसींनी राजेश खिमजी साक्रिया याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीबद्दल आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, साक्रिया हा गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात एकाच पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत. यापैकी बहुतेक हे दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचे, तर काही गुन्हेगारी धमकी आणि हल्ला केल्याचे असे आहेत. दरम्यान हल्ल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय आहे रेखा गुप्ता यांची पोस्ट?

आज सकाळी जनतेशी संवाद साधत असताना माझ्यावर हल्ला झाला. हा हल्ला माझ्यावरचा नसून दिल्लीची सेवा आणि जनतेच्या भल्यासाठी केलेल्या संकल्पावरचा हल्ला आहे. या हल्ल्यामुळे मला स्वाभाविकपणे धक्का बसला. पण आता मी ठीक आहे. मी माझ्या शुभचिंतकांना हे सांगू इच्छिते की मला भेटण्यासाठी आतूर होऊ नका. मी लवकरच तुमच्या सगळ्यांसह काम करताना दिसेन. अशा प्रकारचे हल्ले माझी हिंमत आणि जनतेची सेवा करण्याचा माझा संकल्प हे दोन्हीही तोडू शकत नाहीत. मी आता अधिक उर्जेने काम करणार आहे, लवकरच मी तुमच्या बरोबर जनतेच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहे. जनतेच्या समस्या जाणून त्यावर उपाय योजणं यावर मी भर देईन. तुम्हा सगळ्या दिल्लीकरांनी दाखवलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुम्हा सगळ्यांचं प्रेम, आपुलकी, स्नेह आणि शुभेच्छा याबाबत मी तुमची आभारी आहे. या आशयाची एक पोस्ट दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे.

प्रवीण शंकर यांनी काय सांगितलं?

दिल्ली भाजपाचे प्रवक्ते प्रवीण शंकर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की जनसुनावणीदरम्यान एक तरुण मुख्यमंत्री गुप्ता यांच्याजवळ गेला. त्याने आधी काही कागद मुख्यमंत्र्यांकडे दिले. त्यानंतर तो जोरजोरात ओरडू लागला. ओरडत असतानाच त्याने मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावली. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वय ३५ वर्षे इतकं आहे. दिल्ली भाजपा या घटनेचा निषेध करते असं म्हणत त्यांनी निषेध नोंदवला. दिवसभर या घटनेबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कोण आहे हल्लेखोर?

सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने त्याचं नाव राजेशभाई खिमजीभाई साकरिया असं असल्याचं सांगितलं आहे. ४१ वर्षीय राजेश गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे.