निवृत्तिवेतन योजनेतील संचित रकमेपैकी २५ टक्के रक्कम काढण्याचा प्रस्ताव भविष्यनिर्वाह निधी मंडळाने सादर केला आहे. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्याने सलग दहा वर्षे नोकरी केलेली असावी अशी अट आहे.
भविष्यनिर्वाह निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) यांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या (एनपीएस) लाभार्थीसाठी वरील प्रस्ताव लागू आहे. आजारपणाबरोबरच मुलांची शिक्षणे व त्यांचे विवाह, घरदुरुस्ती किंवा खरेदी या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलताना लागणारा आर्थिक भार थोडा हलका व्हावा यासाठी या योजनेतील सहभागीदार कर्मचाऱ्यांसाठी पीएफआरडीएने २५ टक्के रक्कम काढण्याचा प्रस्ताव मार्गदर्शक मसुद्यात ठेवला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत या प्रस्तावावर लोकांनी त्यांची मते कळवायची आहेत.
कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, हृदयावरील शस्त्रक्रिया, अंधत्व इत्यादींसारख्या आजारांवरील उपचारांसाठीही ही रक्कम काढता येईल.
एनपीएस काय आहे?
एनपीएस ही एक दीर्घकालीन योजना आहे. भविष्यनिर्वाह निधीतील काही भाग या योजनेत समाविष्ट करण्यात येतो. एप्रिल २००४ नंतर सेवेत आलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अनिवार्य असून इतरांसाठीही ती खुली आहे.