घाईघाईत रेल्वे सुटेल म्हणून तिकीट न काढता गाडीत बसल्याने दंड भरावा लागल्याच्या घटना आपण सर्रास पाहतो. त्यामुळे एकीकडे वेळ गाठताना तारांबळ होते आणि दुसरीकडे तिकीट न काढल्याने भुर्दंड सोसावा लागतो. यावर रेल्वे प्रशासनाने एक उत्तम उपाय काढला आहे. विनातिकीट रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये बसल्यावरही तिकीट काढता येणार आहे.
रेल्वे सुटेल या भितीने विनातिकीट रेल्वेत चढणाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. प्रवाशांना रेल्वेची वेळ गाठताना होणारी धावपळ आणि त्यात तिकिटाच्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहिलो तर रेल्वे सुटेल म्हणून तिकीट न काढताच रेल्वे पकडण्याचा प्रकार अनेकदा होताना दिसतो. मग अशा प्रवाशांना टीटीईने पकडल्यावर दंड भरावा लागतो. मात्र या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना टीटीईला घाबरण्याची गरज नाही.
एप्रिल महिन्यापासून ही नवी सुविधा सुरु करण्यात आली असून, त्यासाठी रेल्वेतून खाली उतरण्याची किंवा इंटरनेट वापरण्याची आवश्यकता नाही तर टीटीईकडूनच हे तिकीट प्रवाशांना मिळू शकणार आहे. यावेळी आपण विनातिकीट प्रवास का करत आहोत, याचे कारण प्रवाशाला टीटीईला सांगावे लागणार आहे. या पद्धतीने तिकिट काढणाऱ्या प्रवाशांना नियोजित तिकिटाहून १० रुपये अधिक शुल्क भरावे लागणार आहे. सध्या सुपरफास्ट रेल्वेंसाठी असणारी ही सुविधा येत्या काळात इतर रेल्वे गाड्यांसाठीही राबविण्यात येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
या तिकीटासाठी सहज वापरता येईल अशा मशिनचा वापर करण्यात येणार असून हे मशिन रेल्वेच्या आरक्षण सुविधेशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे नाव आणि जागा टाकल्यावर प्रवाशांना सहज तिकीट मिळू शकणार आहे. या मशिनच्या माध्यमातून रेल्वेतील रिकाम्या बर्थचीही माहिती मिळू शकेल. यामुळे प्रतिक्षा यादीत असणाऱ्या प्रवाशांना आपले तिकीट टीटीईला दाखवून ज्या ठिकाणी जागा असेल तेथे जागा आरक्षित करुन घेता येणार आहे.