या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणात ओबामा यांचे प्रतिपादन

आपल्या नेतृत्वाखाली अमेरिकन अर्थव्यवस्थेने धरलेली उभारी, वांशिक भेदभाव आटोक्यात ठेवण्याचा केलेला प्रयत्न व अंतर्गत दहशतवादाचा समर्थपणे केलेला मुकाबला या त्रिसूत्रीवर भर देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या अखेरच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणात स्वतच्या नेतृत्वाखालील अमेरिकेबद्दलचे आश्वासक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

वंश अथवा धर्मावरून लोकांना लक्ष्य करण्याचे राजकारण आपण नाकारायला हवे, असे मत व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षपणे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना टोला मारला. अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशबंदी करायला हवी, अशा आशयाचे ट्रम्प यांनी केले होते. ‘‘जेव्हा राजकारणी मुस्लिमांचा अवमान करतात, जेव्हा एखादी मशीद लुटली जाते, जेव्हा एखाद्या बालकाला धाकदपटशा दाखविला जातो, तेव्हा आपणही सुरक्षित राहत नाही. अशा पूर्वग्रहदूषित वृत्तीमुळे आपण जगाच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही. आपल्या उद्दिष्टप्राप्तीत अडथळा येईल. ही वृत्ती आपल्या देश या संकल्पनेशी विश्वासघात करणारी आहे’’, अशा शब्दांत ओबामा यांनी द्वेषाच्या राजकारणाबद्दल आपली मते व्यक्त केली.

प्रशंसेच्या गुंजारवातच पार पडलेल्या या भाषणात त्यांनी अमेरिकेच्या सर्वसमावेशक गौरवशाली इतिहासाची आठवणही उपस्थितांना करून दिली. आपल्या ताकदवान सैन्यदलामुळे जग केवळ आपल्याला किंमत देत नाही, आपला मुक्तपणा आणि विविधता यामुळे आपण या आदरास पात्र झालो आहोत, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. परंतु, संबंध सुधारण्याऐवजी पक्षांमध्ये संशयाची भावना गडद झाल्याचे व अमेरिकन राजकारणाने फुटीच्या इंधनावर जोर धरल्याचे दुख आपल्याला होत आहे, अशा शब्दांत ओबामा यांनी अध्यक्षीय निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांच्या सवंग प्रचाराकडे लक्ष वेधले.

More Stories onओबामाObama
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obama speech in state of the union
First published on: 14-01-2016 at 04:13 IST