दोन देशांतील उभयपक्षी धोरणांना बळकटी आणण्याबाबत डॉ.मनमोहन सिंग यांनी आपल्या दृष्टीत नेहमी धाडसीपणा ठेवला असल्याचे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्तुती पत्र लिहीले आहे.
देशांतील संबंधांना बळकटी आणण्याच्या धोरणांतील मनमोहन सिंग यांचे काम नेहमी लक्षवेधी राहील तसेच देशातील तब्बल १४ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि देशाला जागतिक स्तरावरचे नेतृत्व मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा ओबामा यांनी आपल्या पत्रातून केली आहे. तसेच गेली १० वर्षे भारताचे नेतृत्व यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल अभिनंदनही केले.
ओबामा आपल्या पत्रातून म्हणाले की, भारत-अमेरिका या दोन देशांतील व्यापार विस्तृती, ‘सिव्हिल न्यूक्लिअर कॉमर्स’ आणि संरक्षण संबंधांना बळकटी आणण्याच्या दृष्टीने खोलवर प्रयत्न करण्याच्या धाडसीवृत्तीला सलाम आहे. तसेच भारत आणि अमेरिका दरम्यानची भागीदारी विस्तारित करताना कठीण प्रसंगी निभावलेली महत्वाची भूमिकाही वाखाणण्याजोगी आहे. असेही ओबामा म्हणाले.