भुवनेश्वर : ओडिशाचे मंत्री नवकिशोर दास यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय) मार्फत तपास करून यामागील कट उघडकीस आणावा, अशी मागणी भाजपने सोमवारी केली. तर, काँग्रेसने राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडल्याचा आरोप करून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ब्रजराजनगर येथे राज्याचे आरोग्यमंत्री नवकिशोर दास (६० वर्षे) यांच्यावर सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दास याने पिस्तुलातून गोळय़ा झाडल्या. नवकिशोर यांना हवाई मार्गे भुवनेश्वरमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर हा मानसिक रोगाने ग्रस्त असल्याचे सांगितले जाते.

राज्यातील विरोधी पक्षनेते जयनारायण मिश्रा (भाजप) यांनी वार्ताहरांना सांगितले की, आरोग्यमंत्र्यांची हत्या हा एखाद्या कटाचा भाग असावा. कारण हल्लेखोर गोपाळ दास याला एक दिवस आधीच सव्‍‌र्हिस पिस्तूल देण्यात आले होते. ही हत्या राज्य पोलीस दलाच्या एका कर्मचाऱ्याने केली असल्याने त्याचा तपास पोलिसांनी करणे योग्य नाही. जर हा सहायक उपनिरीक्षक मानसिक आजाराने ग्रस्त होता, तर त्याला सव्‍‌र्हिस पिस्तूल का देण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात काही बडय़ा व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकारी गुंतले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठार मारण्याच्या हेतूनेच गोळीबार

याप्रकरणी ब्रजराजनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक कुमार स्वैन यांनी हल्लेखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ दास याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, गोपाळ दास याने अगदी जवळून मंत्र्यावर सव्‍‌र्हिस पिस्तुलातून गोळी झाडली. मंत्र्यांना ठार मारण्याच्या हेतूनेच हा गोळीबार करण्यात आला.