Premium

Odisha Train Accident: महिलेनं रचला पतीच्या मृत्यूचा बनाव; मृतांच्या नातलगांना मिळणाऱ्या रकमेसाठी केलं कारस्थान!

महिलेनं खोटं आधारकार्ड घेऊन थेट रुग्णालयाच्या शवागारात घेतली धाव; म्हणे, “माझ्या पतीचं रेल्वे अपघातात निधन झालंय!”

odisha train accident
ओडिशा रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला, तर ९००हून अधिक जखमी झाले (फोटो – पीटीआय)

गेल्या आठवड्यात शुक्रवारी अर्थात २ जून रोजी संध्याकाळी ओडिशामध्ये तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. यातली एक मालगाडी तर इतर दोन प्रवासी ट्रेन होत्या. या अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अजूनही त्यातल्या अनेक जखमींवर उपचार चालू आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्र सरकार, आसाम सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली. मात्र, ही मदत लाटण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीचा या अपघातात मृत्यू झाल्याचा खोटाच बनाव रचला! विशेष म्हणजे पतीनंच केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला! इंडिया टुडेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिहेरी अपघात, शेकडो जखमी!

शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास ओडिशातील बालासोर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस रेल्वेस्थानकात उभ्या असणाऱ्या मालगाडीला मागून पूर्ण वेगात धडकली. अपघातग्रस्त डबे बाजूच्या रेल्वेट्रॅकवर पलटले. त्या ट्रॅकवरून येणाऱ्या हावडा एक्स्प्रेसला डब्यांची धडक बसल्यामुळे त्या ट्रेनलाही अपघात झाला. या तिहेरी अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, तर किमान ९०० जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

खोटी कागदपत्र घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात

दरम्यान, अपघातग्रस्तांना केंद्र सरकार, पश्चिम बंगाल सरकार आणि ओडिशा सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. ही मदत मिळवण्यासाठी एका महिलेनं चक्क तिच्या पतीचं या तिहेरी अपघातात निधन झाल्याचा बनाव रचला. या महिलेचं नाव गीतांजली दत्ता असून ती ओडिशाच्या कटक जिल्ह्यातल्या मनियाबंद भागातली रहिवासी आहे. अपघातातील मृतदेह ओळख पटवण्यासाठी ठेवलेल्या रुग्णालयात ही महिला पोहोचली आणि तिने तिथे खोटी कागदपत्र सादर केली.

दोन दशकानंतर देशातला सर्वात मोठा अपघात; याआधी शेकडो मृत्यू होणाऱ्या अपघातांची मालिका पाहा

या महिलेनं रुग्णालयात मृत व्यक्तीच्या नावाचं खोटं आधार कार्ड दाखवलं. बालासोरमधल्याच एका व्यक्तीच्या नावे हे आधार कार्ड होतं. ही व्यक्ती म्हणजे आपला पती असून त्याचं रेल्वे अपघातात निधन झाल्याचा दावा या महिलेनं केला. पोलिसांनी जेव्हा याची खातरजमा करण्यासाठी तपास केला, तेव्हा खऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. तपासादरम्यान या महिलेनं सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचं समोर आलं.

पतीनंच दाखल केली तक्रार!

दरम्यान, या महिलेच्या पतीनंच तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. “मला या सगळ्याची लाज वाटते. माझी सगळ्यांना विनंती आहे, की अशा प्रकारच्या महिलांपासून सावध राहा. मी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून मला न्याय हवा आहे”, असं या महिलेच्या पतीनं म्हटलं आहे.

किती मदत केली जाहीर?

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ओडिशातील मृत्यूमुखी पडलेल्या एकूण ३९ व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी १ कोटी ९५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले जातील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Odisha train accident woman fakes husbands death for ex gratia money pmw