जयाप्रदा यांच्यावर नाव न घेता हीन पातळीवर टीका

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात सोमवारी महिलेवर हीन पातळीवर टीका केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला. खान यांनी जयाप्रदा यांच्यावर नाव न घेता ही टीका केली आहे.

सपचे आझम खान आणि भाजपच्या जयाप्रदा हे दोघे रामपूरमध्ये एकमेकांविरोधात उभे आहेत. एका सभेत आझम खान म्हणाले की, ‘‘तुम्हाला दहा वर्षे खासदार मिळाला. रामपूरच्या लोकांनो, उत्तर प्रदेशच्या लोकांनो, हिंदुस्तानच्या लोकांनो त्यांचे खरे रूप समजायला तुम्हाला १७ वर्षे लागली. मला १७ दिवसांत ती समजली.’’ त्यानंतर खान यांनी हीन पातळीवर एक शेरा मारला.

ही टीका जयाप्रदांवरच असून खान यांची लाज वाटते, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंग, भाजपच्या स्मृती इराणी, सुषमा स्वराज यांनीही खान यांच्यावर टीका केली.

आझम खान यांनी मात्र, आपण आपल्या बोलण्यात कोणाचेही नाव घेतलेले नाही तसेच ना त्या व्यक्तीवर टीका केली आहे ना बाजू घेतली आहे. मी फक्त कपडय़ाचा रंग सांगितला आहे, असे सांगत आपल्यावरील गुन्हा टिकू शकत नाही, असा दावा केला. जयाप्रदा यांनी मात्र आझम खान यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. आजवर मी आझम खान यांना भावाप्रमाणे मानत होते, पण आता मी त्यांना भाऊ मानू शकत नाही. त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मात्र, आझम खान यांचा रोख जयाप्रदांकडे नव्हता, असा दावा केला.

‘लक्ष्मणरेषा ओलांडली’

‘समाजवादी पक्षाचे नेते व रामपूरचे उमेदवार आझम खान यांनी माझ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. मी त्यांना भावासारखे मानत होते. आता मात्र त्याचे वागणे सहन करण्यापलीकडे आहे.  मी निवडणूक आयोगाला अशी विनंती करते की त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी. कारण ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत’, अशी प्रतिक्रिया भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांनी दिली आहे.

‘वस्त्रहरण होत असताना भीष्माप्रमाणे मौन बाळगू नका’

स्वराज यांचे ट्वीटद्वारे मुलायमसिंह यांना आवाहन

नवी दिल्ली : द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना ज्याप्रमाणे भीष्म पितामह मौन बाळगून होते तसे शांत राहू नये, असे आवाहन स्वराज यांनी सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांना केले आहे. मुलायमसिंह आपण सपाचे पितामह आहात, तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे, असे असताना तुम्ही भीष्म पितामहांप्रमाणे मौन बाळगण्याची चूक करू नका, असे स्वराज यांनी ट्वीट केले आहे.

महिला आयोगाची नोटीस

आझम खान यांनी  केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी निषेध केला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.  आयोगाने पाठवलेल्या नोटिशीत  आझम खान यांनी केलेले वक्तव्य महिलांच्या सभ्यतेचा अवमान करणारे व अनैतिक आहे. महिला आयोग अशा विधानांचा निषेध करीत असून तुमच्या विधानाबाबत समाधानकारक स्पष्टीकरण आयोगाला द्यावे, असे म्हटले आहे. महिला आयोगाच्या सहसचिव बर्नाली शोम यांनी सांगितले की,  महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी रविवारीच आझम खान यांच्या वक्तव्यास आक्षेप घेतला असून त्यांचे वक्तव्य महिलांचा अवमान करणारे असल्याचे म्हटले होते.