आपल्या कामात दिरंगाई करणाऱ्या आळखी सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

जनतेची कामं करताना आळस आणि तिरस्काराची वृत्ती बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आल्याने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, अशा आळशी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्त देण्याच्या योजनेवर आम्ही काम करत आहोत. अशा आळशी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी अन्यथा परिणामांना सामोरं जावं, असा निर्वाणीचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री रावत म्हणाले, राज्य सरकार जनतेला दिलेल्या आपल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी बांधील असून त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांमधील प्रचलित कामाची पद्धत बदलणे गरजेचे आहे. त्यामुळेच कामात आळस करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती देण्याच्या दिशेने आमचे काम सुरु आहे.