पीटीआय, वॉशिंग्टन
भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. मात्र ट्रम्प आणि मोदी यांच्यात कोणताही संवाद झाला नाही, असे भारताकडून सांगण्यात आले. ऊर्जास्रोतांचा विस्तार वाढविणे आणि बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य ते विविधीकरण करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तेलखरेदीचे अन्य पयार्य उपलब्ध असल्याचे परराष्ट्र विभागाने सांगितले.
ओव्हल कार्यालयात पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे याबद्दल अमेरिका खूश नाही. अशा प्रकारच्या खरेदीमुळे युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक मदत झाली. रशिया- युक्रेन युद्ध चार वर्षे सुरू असून या युद्धात दीड लाख नागरिक गमावले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे मित्र असून आमचे चांगले संबंध आहेत. त्यांनी मला आश्वासन दिले की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. युक्रेन युद्धावरून रशियावर दबाव वाढविण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असून चीनलाही आम्ही हेच करायला लावणार आहोत, असा दावा अमेरिकी अध्यक्षांनी केला.
भारत कदाचित तेल खरेदीमध्ये तात्काळ कपात करू शकणार नाही, परंतु प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
‘मोदी-ट्रम्प यांच्यात संवाद नाही’
अमेरिकी अध्यक्षांनी केलेल्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले की मोदी व ट्रम्प यांच्यात बुधवारी कोणताही दूरध्वनी संवाद झालेला नाही. ‘‘भारत तेल आणि नैसर्गिक वायूचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे यालाच सरकारचे प्राधान्य राहिले आहे,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
स्थिर ऊर्जेच्या किमती आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे हे भारताच्या ऊर्जा धोरणाचे दुहेरी उद्दिष्ट राहिले आहे. बाजारपेठेतील परिस्थिती पूर्ण करण्यासाठी योग्य ते विविधीकरण करण्यात येत आहे,’’ असे जयस्वाल यांनी सांगितले. भारत अमेरिकेबरोबरही ऊर्जा संबंध वाढवण्याचा विचार करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘रशियन ऊर्जा हा किफायतशीर पर्याय’
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत रशियाचे कच्चे तेल हा सर्वात किफायतशीर पर्याय आहे आणि रशियाशी असलेले ऊर्जा संबंध भारताच्या राष्ट्रीय हितांशी सुसंगत आहेत, असे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी सांगितले. रशिया भारताचा सर्वात विश्वासार्ह ऊर्जा भागीदार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही देशात संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांसह एकूण संबंध वाढवण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींना ट्रम्प यांची धास्ती- काँग्रेस
नवी दिल्ली : ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मोदी यांना अमेरिकी अध्यक्षांची धास्ती वाटत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या निर्णयासाठी ते अमेरिकेवर अवलंबून असतात, असा आरोप विरोधी पक्षाने केला. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे कोलमडले आहे. केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलावून विरोधी नेत्यांना विश्वासात घेतले पाहिजे. पंतप्रधानांनी ट्रम्प यांना भारत रशियन तेल खरेदी करणार नाही हे ठरवण्याची आणि जाहीर करण्याची परवानगी दिली, अशी टीका विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
तेल कंपन्यांकडून आयात कमी करण्याची तयारी?
काही भारतीय तेल कंपन्या रशियाकडून तेल आयात कमी करण्याची तयारी करत आहेत, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने तीन सूत्रांच्या आधारे दिले. भारतीय तेल कंपन्या रशियन तेलापासून दूर जाण्याची तयारी करत आहेत. डिसेंबरपासून खरेदीत घट होण्याची शक्यता आहे, कारण नोव्हेंबरसाठीच्या पुरवठ्याची मागणी आधीच देण्यात आली आहे, असे वृत्त देण्यात आले आहे.