केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्यानंततर एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र या व्हिडीओत भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट होताना दिसत आहे.

या व्हिडीओत अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाल्याचं पहायला मिळत आहे. भारतीय लष्कराने मात्र हा व्हिडीओ ९ डिसेंबरच्या घटनेशी संबंधित नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या काही दिवसांनंतरची ही घटना असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते, तर ४० चिनी सैनिक ठार आणि जखमी झाले होते.

व्हिडीओमध्ये चिनी सैनिक भारतीय जमिनीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत परतून लावलं होतं. भारतीय जवान चिनी सैनिकांना दांडक्याने मारहाण करताना दिसत आहेत. भारतीय जवानांनी यावेळी चिनी सैनिकांनी माघारी लोटलं होतं.