करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे दोन रुग्ण भारतात आढळल्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच राज्य सरकारांनी प्रशासनाला योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश दिले असताना केंद्रीय आरोग्य प्रशासन देखील या वृत्तामुळे दक्ष झालं आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट आत्तापर्यंत भारताबाहेरच असल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली असून यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभाग आणि नीती आयोगाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन देशवासीयांना माहिती दिली आहे. तसेच, आवश्यक त्या उपाययोजना तातडीने योजन्याचे निर्देश देखील दिले आहेत.

देशात सापडलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं

ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळताच महाराष्ट्र सरकारने देखील विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी नियमावली कडक केली आहे. कर्नाटकमध्ये आढळलेले हे दोन रुग्ण परदेशी असून ते ६६ आणि ४५ वयाचे असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात असल्याचं देखील ते म्हणाले. या दोघांना करोनाची अत्यंत सौम्य लक्षणं असल्याची देखील माहिती मिळत आहे.

“केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य हे…”

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के. पॉल यांनी कोणती तातडीची पावलं उचलायला हवीत, याविषयी माहिती दिली आहे. “आता केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य हे पात्र व्यक्तींना पूर्णपणे लसीकृत करणं हे आहे. लसीकरणाचा वेग आणि प्रमाण वाढणं ही सध्याची गरज आहे. कुणीही लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्णपणे लसीकृत होण्यात अजिबात उशीर करू नका”, असं डॉ. पॉल यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले २ रुग्ण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बूस्टर डोस बचाव करू शकेल?

ओमायक्रॉनवर करोनाचा बूस्टर डोस प्रभावी ठरेल अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. या डोसमुळे अधिक ताकदवान असलेल्या ओमायक्रॉनपासून संरक्षण करता येण्याइतपत प्रतिकारशक्ती तयार होऊ शकेल, असं देखील म्हटलं जात आहे. याविषयी डॉ. पॉल यांना विचारणा केली असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचं सध्या निरीक्षण करून अभ्यास केला जात आहे. या अभ्यासाच्या आधारावरच याबाबत निर्णय घेता येईल. आमच्या तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांच्या समूहामध्ये यासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे”, अशी माहिती डॉ. पॉल यांनी दिली.