जगभरात सध्या ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. त्याचा अजूनही पूर्ण अभ्यास होणं बाकी असलं, तरी काही मूलभूत निरीक्षणं आणि अभ्यासातून वैज्ञानिकांनी काही निष्कर्ष काढले आहेत. नेदरलँडमध्ये झालेल्या अशाच एका अभ्यासातून हा ओमायक्रॉन व्हेरिएंट दक्षिण अफ्रिकेत सापडण्याच्याही आधी नेदरलँडमध्ये पोहोचला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या निष्कर्षामुळे कुणाच्याही नकळत अशा किती देशांमध्ये, समूहांमध्ये किंवा लोकांपर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंट पोहोचला असेल, याचा गंभीर इशारा मिळाला असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे.

नेदरलँडच्या आरआयव्हीएम हेल्थ इन्स्टिट्युटनं केलेल्या चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे विषाणू नेदरलँडमध्ये अफ्रिकेच्याही आधी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी जमा केलेल्या नमुन्यांमध्ये आढळल्याचं समोर आलं आहे. २३ नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा ओमायक्रॉनचं अस्तित्व आढळल्यानंतर सुरुवातीला त्याला B.1.1.529 असा कोड देण्यात आला होता. मात्र, २६ नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला ओमायक्रॉन हे नाव दिलं.

ओमायक्रॉन व्हेरिएंट खरंच किती धोकादायक? द. अफ्रिकेतीत तज्ज्ञ म्हणतात, “डेल्टाच्या तुलनेत…!”

जगभरातील ३० देशांमध्ये पोहोचला ओमायक्रॉन

दरम्यान, नेदरलँडमध्ये १९ नोव्हेंबर रोजीच या व्हेरिएंटचे नमुने गोळा करण्यात आले असल्याचं समोर आल्यामुळे ओमायक्रॉन नेमका किती देशांमध्ये बेमालूमपणे पसरला असेल, याचा निश्चित अंदाज आत्ता व्यक्त करणं वैज्ञानिकांसाठी कठीण झालं आहे. पहिल्यांदा सापडल्यानंतर गेल्या १० ते १२ दिवसांमध्ये ओमायक्रॉननं जवळपास ३० देशांमध्ये शिरकाव केला असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ३७४ झाली आहे.

Omicron Variant : दक्षिण अफ्रिका ते भारत… कसा पसरला ओमायक्रॉन?

नुकतेच भारतात देखील ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणं असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी ६६ वर्षीय व्यक्ती दक्षिण अफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात आली होती. त्यानंतर करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ती पुन्हा दुबईला गेली. मात्र, ४६ वर्षीय व्यक्तीला प्रवासाचा कोणताही इतिहास नसल्यामुळे भारतातच इतर कुणाकडून त्या रुग्णाला करोनाची लागण झाली का, याविषयी आरोग्य यंत्रणा सखोल अभ्यास करत आहे.