ओमायक्रॉनविरोधात ‘हायब्रिड इम्युनिटी’ करणार भारतीयांचा बचाव? CSIR च्या वैज्ञानिकांचा मोठा दावा!

अनेक भारतीयांमध्ये असलेल्या हायब्रिड इम्युनिटीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात आपल्याला फायदा होईल, असा दावा सीएसआयआरचे संचालक डॉ. अग्रवाल यांनी केला आहे.

corona-endemic
(प्रातिनिधीक छायाचित्र)

अवघ्या १० ते १२ दिवसांत तब्बल ३० देशांमध्ये पसरलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ उडवून दिली आहे. करोनाच्या या व्हेरिएंटमुळे सौम्य लक्षणं जरी जाणवत असली, तरी वेगाने प्रसारित होण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे सर्वच देशांच्या आरोग्य यंत्रणांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर सीएसआयआर इन्स्टिट्युट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी भारतीयांसाठी दिलासादायक माहिती दिली आहे. अर्थात, यामुळे जरी भारतीयांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काळजी घेणं आणि सतर्क राहाणं आवश्यकच असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

नवी दिल्लीतील सीएसआयआर इन्स्टिट्युटमधील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या करोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटविषयी सविस्तर माहिती दिली आहे. हायब्रिड इम्युनिटी ही सर्वात चांगली इम्युनिटी असून भारतात अशा इम्युनिटीच्या लोकांची संख्या जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“सध्या सर्वात चांगली इम्युनिटी कोणती असेल, तर ती हायब्रिड इम्युनिटी आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येमध्ये हायब्रिड इम्युनिटी आहे. तुम्हाला जर आधी करोनाची लागण होऊन गेल्यानंतर एखादा जरी लसीचा डोस दिला गेला असेल, तर तुमच्यात ती हायब्रिड इम्युनिटी तयार होते”, असं डॉ. अग्रवाल यांनी नमूद केलं आहे.

इम्युनिटीचे तीन प्रकार

डॉ. अग्रवाल यांनी एएनआयशी बोलताना हायब्रिड इम्युनिटी म्हणजे काय आणि इम्युनिटीच्या प्रकारांविषयी देखील माहिती दिली आहे. “तीन प्रकारच्या इम्युनिटी असतात. तुम्हाला थेट विषाणूची लागण झाल्यानंतर तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या इम्युनिटीला नॅच्युरल इम्युनिटी म्हणतात. तुम्हाला लस दिल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या इम्युनिटीला व्हॅक्सिन इम्युनिटी म्हणतात, तर आधी करोना होऊन गेलेल्या व्यक्तीला लस दिल्यानंतर त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या इम्युनिटीला हायब्रिड इम्युनिटी म्हणतात”, अशी माहिती त्यांनी दिली.

ओमायक्रॉन व्हेरिएंट खरंच किती धोकादायक? द. अफ्रिकेतीत तज्ज्ञ म्हणतात, “डेल्टाच्या तुलनेत…!”

भारतात तिन्ही प्रकारच्या इम्युनिटी

दरम्यान, भारतात तिन्ही प्रकारच्या इम्युनिटी अस्तित्वात असल्याचं डॉ. अग्रवाल म्हणाले. “भाहतात तिन्ही प्रकारच्या इम्युनिटी असलेले लोक आहेत. पण आयसीएमआरच्या सर्व्हेवरून आपल्याला हे समजलं आहे की या लोकसंख्येच्या मोठ्या हिश्श्याला करोनाची बाधा झाली होती. दुसऱ्या लाटेनंतर आपण मोठ्या प्रमाणावर लसीकरणाला सुरुवात केली. त्यामुळे या लोकांना लस मिळण्याआधीच त्यांना करोनाची लागण होऊ गेली होती. त्यामुळे त्यांच्यात तयार झालेली हायब्रिड इम्युनिटी ही सर्वात शक्तिशाली इम्युनिटी आहे”, असा दावा अग्रवाल यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Omicron variant in india hybrid immunity with vaccine and infection csir scientists pmw

ताज्या बातम्या