दिल्लीतल्या कालकाजी मंदिरातील एका सेवेकऱ्याची शुक्रवारी भक्तांनी मारहाण करत हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कालकाजी मंदिरात काही भाविक दर्शनासाठी आले होते त्यांना वस्त्र आणि प्रसाद मिळाला नाही म्हणून वाद सुरु झाला. त्यावेळी मंदिरात संतापलेल्या भाविकांनी सेवेकऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत त्या सेवेकऱ्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी अतुल पांडेला अटक केली आहे.
पोलिसांनी नेमकं या प्रकरणी काय सांगितलं?
पोलिसांनी सांगितलं की कालकाजी पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. कालकाजी मंदिरात जो वाद झाला त्यानंतर पोलिसांना फोन आला होता. पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचलं. त्यावेळी स्थानिक लोकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हे सांगितलं की आरोपी कालकाजी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी दर्शन घेतल्यानंतर सेवेकऱ्याकडे प्रसाद आणि देवाच्या पायाला लावून वस्त्र द्या अशी मागणी केली होती. ज्यावरुन हा वाद सुरु झाला. त्यानंतर आरोपींनी सेवकऱ्याला मरेस्तोवर मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींनी सेवेकऱ्यावर लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला
आरोपींनी सेवेकऱ्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला, त्याला ठोसे लगावले. या हल्ल्यात सेवेकरी जखमी झाला. त्यानंतर त्याला एम्स ट्रॉमा सेंटरला नेण्यात आलं पण उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. मृत सेवेकऱ्याचं नाव योगेंद्र सिंह असं होतं. तो ३५ वर्षांचा होता, उत्तर प्रदेशातील फत्तेपूरचा तो मूळ रहिवासी होता. योगेंद्र साधारण मागील १५ वर्षांपासून सेवेकरी म्हणून कालकाजी मंदिरात काम करत होता. या प्रकरणी आता कलम १०३ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येचा आरोपांखाली ३० वर्षीय अतुल पांडेला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
राजू या सेवेकऱ्याने काय सांगितलं?
रात्री ९ च्या दरम्यान योगेश नावाच्या सेवेकऱ्याला मंदिराच्या आवारात घेऊन गेले. त्याला लोखंडी सळया, काठी यांनी मारहाण केली. ठोसेही लगावले. योगेश नावाच्या सेवेकऱ्याचा आणि या सगळ्यांचा प्रसाद देण्यावरुन वाद झाला होता. त्या वादातून त्याला मारहाण केली. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला. भाविकांनी त्याला देवाजवळ फळ मागितलं होतं. मात्र आम्ही भाविकांना सातत्याने फळं देत असतो. त्यामुळे त्याने सांगितलं की आत्ता फळ नाहीये मी तुम्हाला थोड्या वेळात देतो. ही बाब त्यांना मुळीच पटली नाही त्याच वादातून त्या सेवेकऱ्याला मारहाण करण्यात आली ज्यात त्याचा मृत्यू झाला.