दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद हे सर्वश्रुत आहेत. केजरीवाल यांनी अनेकदा ट्विटरवरून सरकारच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींना जाहीरपणे लक्ष्य केले आहे. त्यानंतर केजरीवाल आणि मोदी समर्थक यांच्यात अनेकदा ट्विटरयुद्ध जुंपलेलेही पाहायला मिळाले आहे.

आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरही केजरीवाल यांनी मोदींना ट्विटरच्या माध्यमातून एक विनंती केली आहे. महिलांना धमक्या देणाऱ्या किंवा त्यांना ट्रोल करणाऱ्या स्वत:च्या फॉलोअर्सना मोदींनी अनफॉलो करावे आणि त्यांच्यावर करावी, असे केजरीवालांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांपैकी अनेकजणांनी महिलांना हिंसक धमक्या दिल्याचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे हे फॉलोअर्स स्वत:च्या प्रोफाईल पिक्चरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र वापरतात. त्यामुळे केजरीवालांनी या वादग्रस्त फॉलोअर्सना अनफॉलो करावे, असा सल्ला मोदींना दिला आहे. दरम्यान, मोदींच्या सोशल मीडिया पेजची जबाबदारी असणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाने याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी केजरीवालांच्या या विनंतीची दखल घेणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.