Liquor Sell During Onam Festival: केरळमध्ये सध्या ओणम सणाची धूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी या महिन्यात केरळमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. शेतीवाडीत पिकपाण्याला सुरुवात करताना केरळवासी हा सण साजरा करतात. पण यावर्षी या सणासुदीच्या काळातील एक वेगळीच आकडेवारी समोर आली आहे. केरळमध्ये यंदाच्या ओणम सणाच्या काळात तब्बल ८२६ कोटींच्या दारूची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ स्टेट बेवरेजेस कॉर्पोरेशनच्या (KSBC) दुकानांच्या माध्यमातून ही विक्री करण्यात आली आहे. BEVCO या नावाने केरळमध्ये KSBC ची दुकाने आहेत.
केरळमध्ये दरवर्षी ओणम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केरळमध्ये शेतीकामांची सुरुवात हा सण साजरा करून केली जाते. त्याचप्रमाणे मल्याळी नववर्षाचं प्रतिक म्हणूनही या सणाला महत्त्व आहे. ओणम सणाच्या निमित्ताने केरळमध्ये राजा महाबलीच्या वार्षिक स्वागताचा स्वागताचा मुहूर्त म्हणूनदेखील या सणाकडे पाहिलं जातं. या सणाच्या निमित्ताने केरळमध्ये ठिकठिकाणी घरोघरी फुलांची सजावट, कथकली, वल्लमकलीसारखी पारंपरिक नृत्य आणि ओणासद्यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
८२६ कोटींची दारू रिचवली!
या वर्षीही नेहमीप्रमाणे २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात केरळमध्ये ओणम सण साजरा केला जात आहे. मात्र, एकीकडे ओणम सणाचा उत्साह असताना दुसरीकडे मद्यखरेदीचाही उत्साह पाहायला मिळत आहे. केएसबीसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार केरळमध्ये या वर्षीच्या ओणम उत्सवादरम्यान तब्बल ८२६ कोटी ३८ लाख रुपयांची दारू विकली गेली आहे. शुक्रवारी ही माहिती केएसबीसीनं जाहीर केली. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ओणम सणादरम्यान मद्यविक्रीचं प्रमाण तब्बल ६.३८ टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या वर्षी या सणादरम्यान केरळमध्ये ७७६ कोटी ८२ लाख रुपयांची दारू विक्री झाली होती.
एकाच दिवशी १३७ कोटींची विक्री
दरम्यान, उत्रदाम म्हणजेच प्रत्यक्ष ओणम सणाच्या आदल्या दिवशी अर्थात गुरुवारी केरळमध्ये तब्बल १३७ कोटी ६४ लाख रुपयांची दारू विकली गेली आहे. गेल्या वर्षी गा आकडा १२६ कोटी १० हजार इतका होता. त्यामुळे ओणमच्या आदल्या दिवशी झालेल्या दारु विक्रीच्या आकड्यांचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या दिवशी विक्री तब्बल ९.२३ टक्क्यांनी वाढली आहे.
या भागात झाली सर्वाधिक विक्री
दरम्यान, करुणागपल्ली, कोल्लम येथील कावानंद आश्रम, कु्टीप्पला इडाप्पलमधील स्टोअर, चालाकुडी, इरिंजलाकुडा, कुंदरा अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री झाल्याचं दिसून आलं आहेत.
केरळमध्ये आजघडीला BEVCO ची २७८ दुकाने आहेत. याशिवाय १५५ सेल्फ सर्व्हिस स्टोअर्सदेखील आहेत. विशेष म्हणजे प्रत्यक्ष ओणम सणाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतरदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर मद्यविक्रीचे आकडे समोर आले आहेत. शनिवारी केरळमधील ओणम सणाची समाप्ती होईल. २०२४ साली या संपूर्ण उत्सव काळातील मद्यविक्री ८४२ कोटी ७० हजार इतकी होती. यावर्षी ओणम काळातील मद्यविक्रीचे आकडे गेल्या वर्षीपेक्षाही जास्त असतील, असा अंदाज केएसबीसीच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे.