Who is IAS Officer Arti Dogra: एखाद्याच्या बाह्यरुपावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची पारख केली जात असेल तर अशा समाजात शारीरिक व्यंग असलेल्यांना जगणे कठीण होऊन बसते. पण काही लोक सामाजिक गृहितकांना झुगारून इच्छाशक्ती, मेहनतीच्या जोरावर असे काही करून दाखवतात की, एकेकाळी हिणवणारा समाजच त्यांना डोक्यावर घेतो. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे आयएएस अधिकारी आरती डोगरा यांची. अवघी ३.५ फूट उंची असलेल्या आरती डोगरा यांना लहानपणापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र यावर त्यांनी मात करत उल्लेखनीय यश मिळवले.
आरती डोगरा यांचा जन्म १९७९ साली देहरादून येथे झाला. त्यांचे वडील कर्नल राजेंद्र डोगरा आणि कुमकुम डोगरा या शाळेत मुख्याध्यापिका होत्या. शिक्षणाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. उंची कमी असूनही त्याकडे लक्ष न देता आत्मविश्वासाने शिक्षण घेण्यास पालकांनी उद्युक्त केले. अभ्यासाशिवाय शाळेतील इतर उपक्रमातही हिरीरीने सहभागी होण्यासाठी आई-वडिलांनी प्रेरित केले.
आरती डोगरा यांनी देहरादूनमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी भारतातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या अशा यूपीएससी परीक्षांपैकी एक असलेल्या नागरी सेवा परीक्षेवर लक्ष केंद्रीत केले. प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शारीरिक मर्यादाबाबत शंका असूनही त्यांनी बुद्धिमत्ता, शिस्त आणि परिश्रमाच्या जोरावर परीक्षेत तर यश मिळवलेच. मात्र त्यानंतर अधिकारी म्हणूनही आपला ठसा उमटवला.
२००६ साली आरती डोगरा पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाल्या. मागच्या १० वर्षांपासून त्या राजस्थानमध्ये नियुक्त आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध पदावर, विभागात काम केले आहे. या काळात त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पदही भूषविले.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी १०८ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात आरती डोगरा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली गेली. राजस्थानचा वीज पुरवठा विभाग डिस्कॉमचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे. याआधी त्यांनी बिकानेरचे जिल्हाधिकारी असताना उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांविरोधात अभियान राबविले होते. बंको बिकाणो नावाच्या या अभियानाची देशभरात चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा आरती डोगरा यांना त्यांनी आपले सचिव म्हणून नियुक्त केले होते.
