NEET UG परीक्षेतील अनियमिततेबाबत सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयात एक वेगळाच प्रश्न समोर आला आहे. एका प्रश्नाची दोन उत्तरे पर्यायात आले असल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलं. याप्रकरणी एक समिती स्थापन करून उद्यापर्यंत या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय? हे ठरवण्याचे आदेश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले आहेत.

नव्या आणि जुन्या आवृत्तीत प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे

NEET UG परीक्षेत ७११ गुण मिळालेल्या एका विद्यार्थीने एका याचिकेमार्फत या प्रश्नाला आव्हान दिले होते. एका प्रश्नासाठी चार पर्याय असतात. या चारपैकी एक पर्याय बरोबर उत्तर असतं. परंतु, या पर्यायात दोन उत्तरे दिली होती. या संबंधित प्रश्नाचं उत्तर जुन्या आणि नव्या आवृत्तीनुसार वेगवेगळे आहे आणि ही दोन्ही उत्तरे या पर्यायात देण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याचिकाकर्तीने वकिलामार्फत सांगितले की, नव्या आवृत्तीनुसार, या प्रश्नाचं चार पर्यायाचं योग्य उत्तर होते. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना पर्याय २ चा पर्याय निवडला त्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहेत. पर्याय क्रमांक २ हे उत्तर NCERT च्या जुन्या आवृत्तीनुसार योग्य होतं.”

हेही वाचा >> नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; मुख्य सुत्रधारासह तिघांना अटक!

“नकारात्मक मार्किंग टाळण्यासाठी त्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. परंतु, परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दोनपैकी एक पर्याय निवडलेल्या उमेदवारांना पूर्ण गुण दिले आहेत”, असंही याचिकाकर्तीने म्हटलं आहे. यावर सरन्यायाधीश म्हणाले, “सूचना एनसीईआरटीच्या नवीन आवृत्तीनुसार आहे. नवीन एनसीइआरटी आवृत्तीनुसार पर्याय ४ हे योग्य उत्तर आहे. त्यामुळे २ चे उत्तर देणाऱ्यांना पूर्ण गुण देता येणार नाहीत.”

दोन्ही संभाव्य उत्तरे

सरन्यायाधीशांनी पुढे NTA तर्फे उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारले की, “चाचणी पॅनेलने दोनपैकी एक पर्याय निवडलेल्या उमेदवारांना गुण देण्याचा निर्णय का घेतला?” यावर, “दोन्ही संभाव्य उत्तरे होती”, असं उत्तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिले. सॉलिसिटर जनरल म्हणाले की, एनसीईआरटीच्या नव्या आवृत्तीनुसार अभ्यास करायचा होता. परंतु, अनेक गरीब विद्यार्थी त्यांच्या मोठ्या भावंडांकडून जुनी पुस्तके घेतात आणि त्यातून अभ्यास करतात.”

मात्र, सरन्यायाधीश म्हणाले, “पर्याय २ ला गुण देऊन तुम्ही जुन्या आवृत्तीचे पालन करता येणार नाही, या तुमच्याच नियमाविरुद्ध जात आहात.” सरन्यायाधीशांनी वकिलांच्या युक्तिवादाकडे लक्ष वेधले की चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा पर्याय २ चिन्हांकित केल्याने फायदा झाला आहे. “तुम्हाला कोणताही पर्याय निवडावा लागेल. दोन्ही एकत्र असू शकत नाहीत”, असंही चंद्रचूड म्हणाले.

हेही वाचा >> ‘NEET UG’चा केंद्र व शहरनिहाय निकाल जाहीर, न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा निकाल जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयआयटी दिल्लीकडून तज्ज्ञांचे मत मागवण्यात यावे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. “आम्ही आयआयटी दिल्लीच्या संचालकांना NEET UG परीक्षेतील संबंधित विषयातील तीन तज्ज्ञांची टीम तयार करण्याची विनंती करतो. संचालकांनी स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या टीमला विनंती आहे की त्यांनी योग्य पर्यायावर मत तयार करावे आणि उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत रजिस्ट्रारला मत पाठवावे”, असं सरन्यायाधीश म्हणाले.