पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे मोठेपणाने कबूल करावे आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्उभारणीसाठी पाठिंबा मागावा, असे आवाहन देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केले. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. वर्षपूर्तीचा हा दिवस सरकारकडून ‘काळा पैसा विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल. तर विरोधकांकडून ८ नोव्हेंबरला देशभरात ‘काळा दिवस’ पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘ब्लुममर्ग क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाविषयी पुन्हा एकदा भाष्य केले. त्यांनी म्हटले की, नोटाबंदीचे राजकारण आता पुरे झाले, असे मला प्रकर्षाने वाटते. नोटाबंदीचा निर्णय हा खूप मोठा घोळ होता, हे पंतप्रधानांनी मान्य करायची ही वेळ आहे. जेणेकरून त्यानंतर अर्थव्यवस्थेची पुनर्उभारणी करण्यासाठी सरकारला सर्वांचा पाठिंबा मागता येईल, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.

देशात सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या रचनेत बदल करणार : राहुल गांधी

यावेळी मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर यापूर्वी केलेल्या टीकेचा पुनरूच्चार केला. नोटाबंदीचा विपरीत परिणाम विविध स्तरांवर झाला. याचा सगळ्यात मोठा फटका समाजातील निम्न स्तराला बसला. केवळ एखादा आर्थिक निर्देशांक पाहून या परिस्थितीची कल्पना येणार नाही. नोटाबंदीमुळे आर्थिक धोरणांचे खूप मोठे नुकसान झाल्याची बाब सिद्ध झाली आहे. आर्थिक, सामाजिक, देशाची पत आणि संस्थात्मक अशा विविध स्तरावर मोठे नुकसान झाले आहे. देशाचा विकासदर खालावणे हा या सगळ्या व्यापक परिस्थितीचा केवळ एकच कंगोरा होता. विकासदराच्या निर्देशकांपेक्षा नोटाबंदीचा व्यापक असा विपरीत परिणाम हा देशातील निम्न स्तरावर आणि उद्योगांवर झाला आहे. याशिवाय, देशातील लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रावरही याचे त्वरीत परिणाम दिसून आल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले.

कठोर निर्णय घेण्याची क्षमता भारताने सिद्ध केली-अरूण जेटली

तसेच नोटाबंदीनंतर आर्थिक विषमता आणखीनच वाढली. नजीकच्या काळातील निच्चांकी कामगिरीनंतर सध्याचा विकासदर हा उजवा वाटू शकतो. मात्र, समाजात सातत्याने वाढत असलेली आर्थिक विषमता हा आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या स्वरूपासाठी धोकादायक आहे. भविष्यात ही विषमता पुन्हा भरून न निघण्याच्या पातळीला पोहोचली आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातील ही विषमता सामाजिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी बाब आहे. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय विचारहीन आणि घोडचूक असल्याचेही मनमोहन सिंग यांनी सांगितले.