पीटीआय, चंदीगड: Khalistanists leader Amritpal Singh फरार खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंग याच्या शोधासाठी पंजाबच्या होशियारपूर गावात पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. येथील मारनैन खेडय़ात तो दडून बसला असल्याचा संशय असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री फगवारा गावात एका वाहनातून तीन ते चार संशयित जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. माननैनमधील भाई चंचलसिंग गुरूद्वाराजवळ पोलिसांना हे वाहन आढळून आले.
त्यानंतर या परिसरात मोठी शोधमोहीम होती घेण्यात आल्याचे होशियारपूरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. होशियारपूरमधून बाहेर पडणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली असून घरोघरी जाऊनही तपासणी करण्यात येत आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्हीची दृष्येही तपासली जात आहेत. दरम्यान, दिल्लीच्या बाजारातील एक सीसीटीव्ही दृष्यही समोर आले असून यामध्ये गॉगल लावून जाणारा अमृतपाल दिसल्याचा संशय आहे. त्याचा कट्टर समर्थक पपलप्रित सिंगदेखील त्याच्यासोबत असल्याचे यात दिसत असले तरी याला पंजाब पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.
पोलिसांची न्यायालयात कबुली
अमृतपालच्या अटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप त्याला यश आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी पंजाब आणि हरियाणा न्यायालयात दिली. अमृतपाल याला अनधिकृतरित्या पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचा दावा करणारी ‘हेबियस कॉर्पस’ याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. यावेळी झालेल्या सुनावणीत पंजाब पोलिसांनी अमृतपाल सापडत नसल्याची कबुली दिली.
नवी चित्रफीत उजेडात
अमृतपाल सिंग याची एक नवी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसृत झाली आहे. पंजाब पोलिसांनी अनेक तरुणांना नाहक अटकेत ठेवल्याचा आरोप त्याने केला आहे. काळी पगडी आणि शाल घेतलेला अमृतपाल यामध्ये दिसत आहे. आपल्याला अटक करायची होती, तर पोलिसांनी आपल्या घरी यायला हवे होते, असेही तो म्हणतो आहे. या चित्रफितीच्या वैधतेला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.