Operation Mahadev By Indian Army: भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या सहकार्याने ऑपरेशन महादेव नावाने दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली होती. याद्वारे पहलगाम हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारासह तीन दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील लिडवास येथील नागरी भागात चिनार कॉर्प्सने ही कामगिरी केली.
सोमवारी झालेल्या कारवाईदरम्यान सशस्त्र दलांच्या जवानांनी पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबाचा कमांडर हाशिम मूसा याचा खात्मा केला. याबाबत इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
चिनार कॉर्प्सने दुपारी १२:३७ वाजता सांगितले की, लिडवासमध्ये नागरी भागात दहशतवाद्यांशी चकमक झाली आणि एका तासापेक्षा कमी कालावधीत ड्रोन फुटेजमध्ये तीन मृतदेह दिसले, ज्यामुळे तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची पुष्टी झाली.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. याच संघटनेच्या एका शाखेने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

/X)
पलगाम हल्ल्याशी संबंध
सूत्रांच्या माहितीनुसार, डाचिगाव परिसरात संशयास्पद दहशतवादी संदेशाचा शोध लागला आणि त्या संदेशप्रणालीचा वापर करणाऱ्याचा संबंध पहलगाम हल्ल्याशी असल्याचा संशय होता. या माहितीच्या आधारे, गेल्या दोन दिवसांत सैन्याच्या अनेक तुकड्या त्या भागात तैनात करण्यात आल्या आणि संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. आज सकाळी सुमारे ११:३० वाजता, २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा यांच्या संयुक्त पथकाने तीन दहशतवाद्यांना ठार केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या संयुक्त मॉड्यूलचा भाग होते. त्यांच्यावर गेल्या १४ दिवसांपासून सुरक्षादलांकडून लक्ष ठेवण्यात येत होते. या गटात सुमारे ५ ते ७ दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. आज सकाळी, या गटातून फुटलेल्या तीन दहशतवाद्यांचा माग काढून सैन्याने त्यांना ठार केले.
ऑपरेशन महादेव
दरम्यान, या मोहिमेला लष्कराने ऑपरेशन महादेव असे नाव का दिले होते, याबाबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी माहिती दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना कर्नल ढगे म्हणाले की, “श्रीनगरच्या ज्या भागात ही कारवाई करण्यात आली त्या भागात ‘महादेव’ नावाचे शिखर (डोंगराचे नाव) आहे. त्या भागात ही कारवाई झाल्यामुळे या कारवाईला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले.”