Operation Mahadev: “आज त्या २६ निष्पाप लोकांना खरी शांती लाभेल. आज आम्ही शांत झोपू शकतो”, असे भावनिक शब्द आसावरी जगदाळे यांनी पुण्यात उद्गारले. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलेल्या २६ नागरिकांमध्ये जगदाळे यांचे वडीलही होते. जगदाळे यांच्यासह २६ जणांची क्रूर हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेव अंतर्गत झाला असल्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आसावरी जगदाळे यांच्याप्रमाणेच इतर मृतांच्या नातेवाईकांनीही ऑपरेशन महादेवबाबत समाधान व्यक्त केले आहे.
२८ जुलै रोजी श्रीनगरजवळील महादेव टेकड्यांवर सुरक्षा दलांनी राबवलेल्या कारवाईत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आणि त्याच्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी ऑपरेशन सिंदूर संदर्भातील चर्चेत या तिघांना पहलगामचे ‘कसाई’ असल्याचे म्हटले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दोषी असलेल्या दहशतवाद्यांना मोकळे सोडले जाणार नाही, हा संदेश देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले. या मोहिमेद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ, भारत पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारांना शोधत होता. अखेर २८ जुलै रोजी ही मोहीम यशस्वी ठरली.
“मी भारतीय लष्कर आणि भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानते. आज त्या २६ निरपराध नागरिकांना खरी शांती लाभेल. आज आपणही शांततेत श्वास घेऊ शकतो. अशी क्रूर घटना पुन्हा कधीही घडू नये आणि आपल्या देशात कायम शांतता नांदावी, हीच आमची प्रार्थना आहे”, अशी प्रतिक्रिया आसावरी जगदाळे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या प्रकारच्या अमानवी कृत्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने महादेवसारखी कठोर आणि ठोस कारवाई सातत्याने राबवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पहलगाम हल्ल्यात पतीला गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी इंडिया टुडे टीव्हीशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. “पतीचा मृत्यू झाल्यानंतर माझ्या आयुष्यात एकटेपण आले आहे. कोणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती. पण, मग मला जाणवले की, जर मी बोललेच नाही तर लोकांना समजणार तरी कसे की माझ्यावर काय ओढावले आहे? जेव्हा लोक माझ्या वेदना समजून घेतात, तेव्हा त्यांचे पाठबळ मला उभे राहण्याची ताकद देते. मी सध्या ज्या संकटातून जात आहे, ते कुणालाही अनुभवायला लागू नये”, असे त्या म्हणाल्या.
“आज मी माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबांसाठी आधार आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, तेही माझी तितक्याच प्रेमाने आणि आदराने काळजी घेत आहेत. ही जबाबदारी दोन्ही बाजूंनी निभावली जात आहे. मला अभिमान वाटतो की मी अशा समाजात राहते, जिथे माझ्या आजूबाजूचे लोक माझे मित्र, कुटुंब, शुभमचे मित्र माझ्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत. तेच माझे खरे आधारस्तंभ आहेत,” असेही ऐशन्या द्विवेदी म्हणाल्या.
पहलगाम युद्धानंतर शहीदांच्या कुटुंबांची प्रतिक्रिया
मृत कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी एएनआयशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास होता की, हे भयावह कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांना योग्य शिक्षा दिली जाईल. आज ते दहशतवादी ठार मारण्यात आले, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. मी भारतीय लष्कराचे मनःपूर्वक आभार मानते.
भारतीय नौदलातील शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल यांनीही सुरक्षादलांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. “मी भारतीय सैन्य, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे आभार मानतो. त्यांनी दाखवलेले धैर्य आणि शौर्य अवर्णनीय आहे. महादेव शिखरासारख्या कठीण भौगोलिक परिस्थितीत दहशतवाद्यांना शोधून निष्क्रिय करणे सोपे नव्हते. त्यांच्या पराक्रमासाठी त्यांचा सन्मान व्हायलाच हवा”, असे त्यांनी सांगितले.