वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किमान १०० दहशतवादी आणि पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती लष्करी संचालनाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईला दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. यापुढे कोणतीही आगळीक झाली, तर त्याला अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत पाकिस्तानला खडसावण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर २४ तासांनी तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चार दिवस चाललेल्या या मोहिमेची पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सुयोग्य समन्वयातून अचूक आणि जलदगतीने मोहिमा फत्ते केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ही कारवाई नेमके लक्ष्य समोर ठेवून, मोजूनमापून आणि तणाव वाढणार नाही, हे लक्षात घेऊन करण्यात आली. मात्र भारताच्या सार्वभौमत्वाला यापुढे कुणी आव्हान दिले, तर निर्णायक कारवाई केली जाईल, असा इशारा घई यांनी यावेळी दिला. त्यांच्याबरोबर हवाई दलाचे अधिकारी एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदलाचे अधिकारी व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद उपस्थित होते. पहलगाम हल्ला करणारे आणि त्याचा कट आखणाऱ्यांना योग्य धडा शिकविण्यासाठी या मोहिमेचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे घई यांनी स्पष्ट केले. यामध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले असून आयसी-८१४ विमान अपहरण आणि पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेले युसूफ अझर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सिर अहमद यांच्यासारखे दहशतवाद्यांचे म्होरकेही ठार झाले आहेत.
भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. सीमेवर तोफगोळ्यांचा मारा आणि महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन-क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले चढविण्यात आले. भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणांनी तसेच सीमेवर तैनात जवानांनी सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. मात्र या हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याने ९ आणि १० मे दरम्यान मध्यरात्री पाकिस्तानी लष्कराच्या आठ ठिकाणांवर निर्णायक हल्ले चढविल्याची माहिती एअर मार्शल भारती यांनी दिली. यामध्ये महत्त्वाच्या धावपट्ट्या आणि रडार यंत्रणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानची संरक्षण आणि हल्ल्यांची क्षमता क्षीण झाली व त्यांना शस्त्रसंधीसाठी हात पुढे करावा लागल्याची माहिती सूत्रांनी सांगितले.
शनिवारी दुपारी शस्त्रसंधीसाठी पहिला फोन हा पाकिस्तानच्या डीजीएमओंकडूनच आपल्याला आल्याचे घई यांनी पुन्हा एकदा सांगितले. आज, सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तर एअर मार्शल भारती यांनी पाकिस्तानची काही लढावू विमाने पाडल्याचे स्पष्ट केले. मात्र ही विमाने भारताच्या हद्दीत येऊच न दिल्यामुळे त्यांचे अवशेष सापडले नसल्याचे ते म्हणाले. भारताची काही विमाने पडल्याचे वृत्त परदेशी माध्यमांनी दिले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारती म्हणाले, की युद्धामध्ये काही नुकसान अटळ असते. पण आपले सर्व वैमानिक सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे लष्कर आणि हवाई दल आपली कामगिरी चोख पार पाडत असताना नौदलही पूर्णत: सज्ज ठेवण्यात आल्याचे व्हाईस अॅडमिरल प्रमोद यांनी स्पष्ट केले.
‘संधी’ असताना शस्त्रसंधी का? – विरोधक
मुंबई / नवी दिल्ली : भारताकडे पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना शस्त्रविराम का करण्यात आला, असा सवाल आता विरोधी पक्ष करू लागले आहेत. ट्रम्प यांच्या सांगण्यावरून शस्त्रविराम स्वीकारण्यात आल्यामुळे जगात भारताची बेअब्रू झाली, अशी टीका ठाकरे गटाने केली असून वंचित बहुजन आघाडीनेही असाच सूर लावला. दुसरीकडे, केंद्राने काश्मीर प्रश्नावर अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का, असा खोचक सवाल काँग्रेसने केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून सर्वपक्षीय बैठक तसेच संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली.
जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे पुरावे देणारी अशी अनेक छायाचित्रे रविवारच्या सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत दाखविण्यात आली.
पाकिस्तानातील एकूण २१ दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण केंद्रांची माहिती गोळा करण्यात आली. मात्र यातील काही तळ हे हल्ल्याच्या शक्यतेने रिकामे केले होते. काही ठिकाणी सामान्य नागरिकांचे अधिक बळी जाण्याची शक्यता होती. त्यामुळे नऊ स्थळांची हल्ल्यासाठी निवड करण्यात आली. – लेफ्ट. जन. राजीव घई, डीजीएमओ