Operation Sindoor २२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या घटनेचा निषेध देशभरात नोंदवण्यात आला. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची बाबही समोर आली. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानला काय उत्तर दिलं जातं? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. भारताने ६ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागासमोरील भागात लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. दरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच नकारात्मक बोलणाऱ्यांना इशारा दिला आहे.
ऑपरेशन सिंदूरमधून एक संदेश जगात गेला आहे
ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. यातून हा संदेश देण्यात आला की जो कुणी आपल्या देशाच्या विरोधात डोळे वटारुन बघेल, आपल्या देशात दहशतवाद माजवेल, भगिनींचं कुंकू पुसेल त्याला कसा धडा शिकवू शकतो याचं उदाहरण म्हणजे ही मोहीम आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात सुरक्षित असल्याची भावना पुन्हा निर्माण झाली आहे. एक जाणीव प्रत्येकाला झाली की आपल्या देशाचं नेतृत्व, आपली सैन्य दलं ही शांत नाहीत असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.

सैनिकांना वंदन करा-अनुपम खेर
पाकिस्तानचे जे दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले ती संपूर्ण मोहीम कशी पार पडली याची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी. त्या दोघींना पाहून माझी छाती अभिमानाने फुलून आली. आपल्या देशाच्या महिलांची शक्ती दिसून आली. आपल्या देशातल्या महिलांचं कुंकू २२ तारखेच्या हल्ल्यात पुसण्यात आलं. मात्र शत्रू राष्ट्राला आपल्या महिलांनीच ऑपरेशन सिंदूरद्वारे उत्तर दिलं. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की जिथे आपण असू सेनेच्या जवानाला पाहिलं तर त्यांना वंदन करा. त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.
नकारात्मक बोलणाऱ्यांना इशारा
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो. मी १९६२ चं युद्ध पाहिलं आहे, १९६५ चं युद्ध पाहिलं आहे, १९७१ चं युद्ध पाहिलं आहे, सगळी युद्धं पाहिली आहे. मी लष्करातल्या अधिकाऱ्यांना पाहिलं आहे. त्यांना पाहून वंदन करावंसं मला कायमच वाटतं. जे नकारात्मक बोलतात त्यांचा मी इशारा देऊ इच्छितो की हे तुम्ही असं केलंत तर तुम्हाला देशाबाहेर हाकलण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल. आपल्या सैन्य दलाच्या सगळ्यांना मी सॅल्यूट करतो असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.