‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’द्वारे दहशतवादाच्या सूत्रधारांना भारतीय नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचे परिणाम काय होतात, याबद्दल स्पष्ट संदेश दिला, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे लोकांमध्ये समाधानाची भावना आली. तर ‘ऑपरेशन महादेव’ने या समाधानाचे आत्मविश्वासात रूपांतर झाल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले.

‘ऑपरेशन महादेव’ यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांचा सत्कार गृहमंत्री शहा यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सशस्त्र दलांनी मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. ‘ऑपरेशन महादेव’च्या माध्यमातून, सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ठार केले होते. या हल्ल्यांद्वारे सुरक्षा दलांनी जगाला दाखवून दिले, की दहशतवादी भारताला हानी पोहोचवू शकत नाहीत आणि पळून जाऊ शकत नाहीत, असे गृहमंत्री शहा यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये पर्यटन ऐन बहरात असताना, पहलगाम हल्ला हा ‘काश्मीर मिशन’ला हाणून पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न होता, असे शहा म्हणाले. लष्कर आणि निमलष्करी दलांच्या बरोबरीनेच जम्मू आणि काश्मीर पोलीसही आता दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आघाडीची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी, प्रत्येकाने ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘महादेव’बद्दल समाधान व्यक्त केले आणि सुरक्षा दलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रीय सुरक्षेवरील हाच विश्वास भारताच्या प्रत्येक क्षेत्रात जगातील सर्वोच्च स्थान मिळविण्याच्या आकांक्षेचा पाया आहे. भारतीय नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना बळकट केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण देशाच्या वतीने सुरक्षा दलांचे अभिनंदन करतो. – अमित शहा, गृहमंत्री