Operation Sindoor News Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक नवी माहिती समोर आली आहे. भारताने पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या खुलासा केला की, पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये चीनने पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता.
वायुसेनेचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “पाकिस्तानने भारतावर डागलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये चीनच्या पीएल-१५ लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा समावेश होता.” हा खुलासा करताना त्यांनी चिनी क्षेपणास्त्रांचे अवशेषही माध्यमांना दाखवले, ज्याचा एक भाग पंजाबमधील होशियारपूर येथे सापडला होता.
भारतीय हवाई दलाने केवळ पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रेच पाडली नाहीत तर त्यांचे स्रोत देखील शोधून काढले. एअर मार्शल म्हणाले की, “पाकिस्तानने पीएल-१५ सारख्या चिनी क्षेपणास्त्रांचा तसेच तुर्की बायकर वायएचए III कामिकाझे ड्रोनचा वापर केला. भारताने आतापर्यंत चीन-पाकिस्तान लष्करी युतीवर सार्वजनिकरित्या भाष्य केले नव्हते, परंतु यावेळी भारताने पहिल्यांदाच थेट चीनचे नाव घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन आणि पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासूनचे धोरणात्मक संबंध आहेत, ज्यामध्ये राजकीय, आर्थिक आणि आण्विक सहकार्य तसेच शस्त्रास्त्र पुरवठा यांचा समावेश आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
पीएल-१५ क्षेपणास्त्र
पीएल-१५ हे एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना (एव्हीआयसी) ने विकसित केलेले एक आधुनिक, लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे लक्ष्य करू शकते. त्याची निर्यात आवृत्ती पीएल-१५ई पाकिस्तानकडे असलेल्या जेएफ-१७ ब्लॉक III आणि जे-१०सीई या लढाऊ विमानांमध्ये बसवण्यात आली आहे.
या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक मार्गदर्शन प्रणाली आहे, ज्यामध्ये इनर्शियल नेव्हिगेशन, चीनचे बेईडौ उपग्रह अपडेट, ड्युअल-वे डेटा लिंक आणि एईएसए रडार यांचा समावेश आहे. त्याचा वेग मॅक ५ पेक्षा जास्त असू शकतो आणि त्याचे वॉरहेड २० ते २५ किलोग्रॅम वजनाचे असते.
क्षेपणास्त्र पुरवठादार म्हणून चीनला भारताने जाहीरपणे लक्ष्य करणे हे एक धोरणात्मक संकेत आहे. यावरून असे दिसून येते की, चीन पाकिस्तानसोबतच्या लष्करी संबंधांची जबाबदारी टाळू शकत नाही, विशेषतः अशा वेळी जेव्हा चीन, स्वतःला शांतता प्रस्थापित करणारा देश म्हणून सादर करू इच्छित आहे.