Operation Sindoor before and after Video : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर एकमत झालं आहे. यानंतर आज (११ मे) भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या वरिष्ठ लष्करी कमांडर्सनी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी मिळून ही मोहिम राबवली होती.

या पत्रकार परिषदेत लेफ्टनंच राजीव घई, डायरेक्टर जनरल ऑफ मिलीटरी ऑपरेशन्स(DGMO) यांच्यासह एअर मार्शल अवधेश कुमार भारती, डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स (DG Air Ops), व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद, डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स (DGNO), आणि मेजर जनरल एसएएस शारदा (ADGSC) हे सहभागी झाले होते.

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी स्पष्ट केले की, सैन्याने ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला ज्यामध्ये १००हून अधिक दहशतादी, ज्यामध्ये युसुफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदसिर अहमद अशा नावाजलेल्या दहशतवाद्यांचा समावेश होता, जे भारताविरोधातील मोठे दहशतवादी हल्ले, जसे की आयसी-८१४चे अपहरण आणि पुलवामा दहशतवादी हल्ला यामध्ये सहभागी होते.

पुढे एअर मार्शल ए के भारती यांनी भारतीय सैन्याच्या क्षेपणास्त्रांचा प्रभाव दाखवून देणारे व्हिडीओ शेअर केले. यामध्ये मुरीदके आणि बहावलपुर येथे करण्यात आलेल्या यशस्वी स्ट्राइक्सचे व्हिडीओ दाखवण्यात आले. या कारवाईदरम्यान प्रमुख दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचे श्रेय डीजीएमओ घई यांनी भारतीय हवाई दलाला दिले.

७ मेच्या मध्यरात्रीपासून १० मेच्या रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रविरामाच्या उल्लंघनापर्यंतच्या कारवाईची माहिती आज भारतीय लष्करानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. उद्या १२ मे रोजी भारत व पाकिस्तान यांच्या डीजीएमओंमध्ये शस्त्रविरामावर होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आणि त्यात भारतीय लष्करानं स्पष्ट केलेली भूमिका महत्त्वाची होती.