Operation Sindoor Hailed By Britain MP: ब्रिटनच्या खासदार प्रीती पटेल यांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि ब्रिटिश सरकारला भारतासोबत दहशतवादविरोधी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना पटेल यांनी पीडितांना पुन्हा श्रद्धांजली वाहिली आणि पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या संघटनांकडून निर्माण होणाऱ्या सीमापार दहशतवादी धोका गांभीर्याने घेण्याचे आवाहन ब्रिटन सरकारला केले.

भारताला तो अधिकार आहे

“अध्यक्ष मदोदय, ही एक अनिश्चित परिस्थिती आहे आणि आपल्याला भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होताना पहायचा आहे. हे देखील स्पष्ट आहे की, भारताला स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि पहलगाममधील पीडितांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आणि त्यांना धोका असलेल्या घृणास्पद दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी पावले उचलण्याचा अधिकार आहे. हे स्पष्ट आहे की, पाकिस्तानमधील दहशतवादी भारत आणि पाश्चात्य हितसंबंधांना धोका निर्माण करतात,” असे ब्रिटनच्या खासदार प्रीती पटेल यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हटले.

ओसामा बिन लादेन ज्या देशात लपला होता…

“ओसामा बिन लादेन ज्या देशात लपला होता तो हाच देश होता. आणि दहशतवाद्यांनी भारतावर केलेल्या हिंसाचाराच्या दीर्घ इतिहासामुळे, ब्रिटनने भारताबरोबर दीर्घकालीन सुरक्षा सहकार्य करार केले आहेत. खरे तर, गेल्या आठवड्यात, या सभागृहाने सरकारला त्या दीर्घकालीन सुरक्षा करारांची आठवण करून दिली, ते का अस्तित्वात आहेत आणि ते ब्रिटनमध्ये आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत,” असेही प्रिती पटेल पुढे म्हणाल्या.

अमेरिकेची भूमिका

भारताच्या लष्करी कारावाईनंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि पाकिस्तानला संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर दोन्ही देशांना मध्यस्थीसाठी गरज भासली तर, त्यासाठी ते उपलब्ध असतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

“मी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी सहमत असून, त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मला त्यांच्यातील तणाव थांबलेला पाहायचा आहे. त्यांनी जशास तसे उत्तर दिल्यामुळे, ते आता थांबतील अशी मला आशा आहे. हा तणाव दूर करण्यासाठी जर त्यांना माझी मदत लागली, तर मी त्यासाठी उपलब्ध असेन”, असे डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.