Operetion Sindoor In Madrasas: उत्तराखंड मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांनी मंगळवारी घोषणा केली की, पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई, हा राज्यातील मदरशांच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरबाबतचा धडा लवकरच अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल.
“आम्ही संरक्षणमंत्र्यांना भेटलो आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन केले. उत्तराखंडमधील मदरशांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आमच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, आम्ही अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा समावेश करणार आहोत,” असे कासमी यांनी सामगितले.
काँग्रेसला लक्ष्य करत ते म्हणाले की, पक्षाने “समुदायाला एकाकी पाडले असून, मुख्य प्रवाहापासून दूर नेले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही मसरशांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबतचा धडा शिकवला जाईल याची खात्री करू. आम्ही मुलांना ऑपरेशन सिंदूर काय होते आणि ते का आवश्यक होते हे शिकवू. ऑपरेशन सिंदूर आवश्यक होते कारण पाकिस्तान हा एक दुष्ट देश आहे आणि त्यांनी आपल्या नागरिकांचे जीव घेतल्यामुळे त्यांना धडा शिकवावा लागला.”
उत्तराखंड मदरसा बोर्ड कायदा, २०१६ अंतर्गत, मदरसा बोर्ड अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, सूचनात्मक साहित्य लिहून देऊ शकते आणि अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसाठी हस्तलिखिते देखील तयार करू शकते.
मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांनी यापूर्वीच घोषणा केली होती की, हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण यांच्यासोबत मदरशांमध्ये संस्कृत भाषा शिकवण्यास सुरुवात करणार आहोत. पण, याला अद्याप सुरुवात झालेली नाही.
दरम्यान, राज्य सरकार मदरसा बोर्ड किंवा शिक्षण विभागाकडून मान्यता प्रमाणपत्राशिवाय चालणाऱ्या मदरशांवर मोहीम राबवत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये मुख्यमंत्री धामी यांनी या संदर्भात निर्देश दिल्यापासून राज्यात १८० हून अधिक मदरसे सील करण्यात आले आहेत.
ऑपरेशन सिंदूर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये एका परदेशी पर्यटकासह २५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने कठोर कारवाई करत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते