नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबत संसदभवनातून मोर्चाने निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात निघालेल्या विरोधकांच्या मोर्चाने सोमवारी राजधानीतील वातावरण ढवळून निघाले. खासदारांच्या घोषणाबाजीमुळे संसदेचा परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर खासदारांनी तेथेच ठिय्या देत सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संसदेच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या परिवहन भवनासमोर पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अडथळे उडी मारून पार केले आणि पोलिसांची नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसच्या सुष्मिता देव, संजना जाटव, ज्योतिमणी आदी काही खासदारांनी लोखंडी अडथळ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली. मोर्चामध्ये शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, द्रमुकचे टी. आर. बालू, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, ‘आप’चे संजय सिंह, प्रियंका गांधी-वढेरा, सुप्रिया सुळे, कणिमोळी आदी खासदार सहभागी झाले होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी अस्सल मराठीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेसचे शशी थरूर आणि मनीष तिवारीही मोर्चात दिसले. मोर्चादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या मिताली बाग, महुआ मोईत्रा या दोघी चक्कर आल्याने खाली पडल्या. समाजवादी पक्षाच्या संजना जाटव यांनाही नंतर रुग्णालयात नेण्यात आले.
मोर्चानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. ‘‘ही लढाई आता केवळ राजकीय राहिलेली नाही, देशाचा आत्मा संविधान आहे, त्यासाठी आम्ही लढत आहोत. एक व्यक्ती, एक मत हे संविधानाचे मूलभूत तत्त्व आहे. कर्नाटकमध्ये एक व्यक्ती, अनेक मत, अनेक व्यक्ती, अनेक मत असल्याचे दिसले आहे. आता निवडणूक आयोगाला लपून राहता येणार नाही. आम्ही सार्वजनिक केलेला (मतांच्या चोरीचा) माहिती-विदा आयोगाचाच आहे. तो चुकीचा असेल तर त्यांच्या संकेतस्थळावरून काढून टाकावा. देशाच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतांची चोरी झालेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडील माहिती-विदावर नियंत्रण ठेवत आहेत. पण, तो बाहेर येईल. आम्ही ही माहिती लोकांसमोर आणू,’’ असे राहुल गांधी यांनी मोर्चानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.