पीटीआय, अहमदाबाद : गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातून पुराचे पाणी ओसरू लागले असून तेथील यंत्रणा पूर्ववत करण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. जुनागढमध्ये जवळपास तीन हजार लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी हलवल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, हवामान खात्याने गुजरातला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ दिला असून सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला.

पुढील २४ तासांमध्ये देवभूमी द्वारका, राजकोट, भावनगर आणि वलसाड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर काही तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडेल असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे. जुनागढमध्ये शनिवार सकाळी सहा ते रविवार सकाळी सहा या २४ तासांच्या कालावधीत २४१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, पुराच्या पाण्यात अनेक कार आणि मृत गुरे वाहून गेली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नोएडामध्ये पुराचा इशारा, २०० जणांना हलवले

नोएडामध्ये पुराचा इशारा देण्यात आला असून हिंडन नदीच्या काठावरील जवळपास २०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सखल भागात पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये यमुना पुन्हा धोक्याच्या पातळीवर

नवी दिल्ली : दिल्लीमधील यमुना नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली असून देशाच्या राजधानीमध्ये पुन्हा पूर येण्याची भीती आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसानंतर हरियाणातील हथनीकुंड धरणाची पातळी वाढून त्यातील पाण्याचा विसर्ग यमुना नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे यमुनेची पातळी वाढून २०६.३१ इतकी झाली आहे. ती २०६.७ मीटरपेक्षा जास्त झाली तर पूरप्रवण भागाला फटका बसू शकतो.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आणि गुजरातमधील विविध ठिकाणच्या पूरस्थितीबाबत चौकशी केली. तसेच त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याशी यमुना नदीच्या पातळीबद्दल चर्चा केली.